कणकवलीतील 26 गावांमध्ये टेस्टिंग वाढविण्याच्या सूचना

हॉटस्पॉट ठिकाणी लक्ष केंद्रित करणार:वैशाली राजमाने

*💫कणकवली दि.१५-:* कणकवली तालुक्यामधे सद्यस्थितीत सुमारे चार हजार सक्रिय रुग्ण आहेत. तालुक्यातील 26 गाव अथवा वाड्यांमध्ये तसेच शहरातील सात ठिकाणी दहापेक्षा जास्त सक्रिय रुग्ण असल्याने या हॉटस्पॉट च्याठिकाणी टेस्टिंग वाढविण्याच्या सूचना प्रांताधिकारी वैशाली राजमाने यांनी दिल्या आहेत. सद्यस्थितीत हॉटस्पॉट ठिकाणी लक्ष केंद्रित करण्यात येत असून येथील लोकांनी प्रशासनाला सहकार्य करावे आणि आपले कुटुंब,आपली वाडी, गाव कोरोना मुक्त करूया असे आवाहनही श्रीमती राजमाने यांनी केले आहे. कणकवली तालुकास्तरीय टास्कफोर्सची बैठक तहसीलदार कार्यालयात श्रीमती वैशाली राजमाने यांच्या अध्यक्षतेखाली झाली. यावेळी तहसीलदार रमेश पवार, गटविकास अधिकारी अरुण चव्हाण, तालुका आरोग्य अधिकारी डॉ. संजय पोळ, उपजिल्हा रुग्णालयाचे वैद्यकीय अधीक्षक डॉ. सी. एम. शिकलगार नगरपंचायतचे प्रतिनिधी व इतर कर्मचारी उपस्थित होते. तालुक्यात कलमठ, लिंगेश्वर, ओसरगाव, नांदगाव, खारेपाटण दक्षिण बाजार, जानवली, खारेपाटण संभाजीनगर, तोंडवली, तळेरे फोंडाघाट, वागदे, कसवण, तरंदळे, ओझरम्, डांमरे, वरवडे, चिंचवली, फोंडा गाव, पियाळी, दारूम, कासरल, कासार्डे, करूळ, फोंडा उत्तर बाजार, घोणसरी आदीं 26 गावे अथवा वाड्यांमध्ये मिळून 3841 सक्रिय रुग्ण सोमवार पर्यंत होते. तर कणकवली शहरांमध्ये बाजारपेठ, शिवाजीनगर, विद्यानगर टेंबवाडी परबवाडी, जळकेवाडी, मधलीवाडी या ठिकाणी मिळून 99 सक्रिय रुग्ण होते. या प्रत्येक भागात दहा किंवा त्यापेक्षा अधिक रुग्ण असल्याने हा भाग किंवा संबंधित गावांमधील वाडी हॉटस्पॉटमध्ये येते. दहापेक्षा जास्त सक्रिय रुग्ण असलेल्या ठिकाणी गावांमध्ये किंवा वाड्यांमध्ये टेस्टिंग वाढविण्यात येणार आहे, आरोग्य विभागाला तशा प्रकारच्या सूचना देण्यात आल्या असून या वाड्या-वस्त्या मधील लोकांनी प्रशासनाला सहकार्य करावे. या भागातील 45 वर्षावरील नागरिकानी लसीकरण करून घ्यावे. प्रत्येकाने सामाजिक अंतर राखणे मास्कचा वापर आणि सॅनिटायझरचा वापर करणे या त्रिसूत्रीचा अंगीकार करावा. येथील लोकांनी अत्यावश्यक काम वगळता ही साखळी तोडण्यासाठी काही दिवस घरी थांबणे इतरांमध्ये न मिसळणे अत्यावश्यक आहे. याबाबतची बंधने काही दिवसांसाठी पाळली तर तालुक्यातील हॉटस्पॉट कमी होतील. त्यासाठीचे सर्व प्रयत्न प्रशासनाकडून केले जात आहेत. तरी सर्व नागरिकांनी यासाठी सहकार्य करावे यातून आपण कुटुंब, वाडी, गाव कोरोना मुक्त करूया, असे आवाहन श्रीमती राजमाने यांनी यावेळी केले.

You cannot copy content of this page