रस्त्यावरील खड्ड्यांची पूजा करून जनतेला जीवदान देण्याचे घालणार साकडे;सभापती अजिंक्य पाताडे, तालुकाध्यक्ष धोंडी चिंदरकर यांनी दिली माहिती
*💫मालवण दि.०५-:* मालवण कसाल रस्त्यावरील खड्ड्यांमुळे सर्व सामान्य जनतेचे कंबरडे मोडले आहे. सत्ताधारी लोकप्रतिनिधी फक्त बघ्याची भूमिका घेत आहेत. म्हणूनच येत्या चार दिवसात भाजप अभिनव आंदोलन करून मालवण कसाल रस्त्यावरील खड्ड्यांची पूजा करून त्यांना जनतेला जीवदान देण्याचे साकडे घालणार आहे, अशी माहिती सभापती अजिंक्य पाताडे व भाजपचे तालुकाध्यक्ष धोंडी चिंदरकर यांनी दिली आहे. मालवण कसाल व इतर प्रमुख रस्त्यांची खड्ड्यांमुळे दुर्दशा झाली असताना सत्ताधारी लोकप्रतिनिधींकडून विकासाच्या फक्त वल्गना केल्या जात आहेत. त्यांनी जनतेला वाऱ्यावर सोडले आहे. वाहनचालक, रिक्षा व्यावसायिक यांचे या खड्ड्यांमुळे आतापर्यंत अतोनात नुकसान झाले आहे. आता पर्यटन हंगाम सुरू झाल्याने खड्ड्यांमुळे अपघात होण्याच्या घटना वाढण्याची भीतीसुद्धा या पाताडे व चिंदरकर यांनी व्यक्त केली. आता खड्ड्यासोबत जगायचे असल्याने खड्ड्यांची पूजा करून त्यांनाच जनतेचे जीव वाचवण्याचे उपहासात्मक साकडे भाजपतर्फे घालण्यात येणार असल्याचे त्यांनी सांगितले. तसेच सार्वजनिक बांधकाम विभागाला या रस्त्याचे काम करण्याबाबत आठ दिवसांचा अल्टिमेटम देण्यात येणार आहे. या सदर आंदोलनात जनतेनेही उस्फुर्त सहभाग घ्यावा, असे आवाहन पाताडे व चिंदरकर यांनी केले आहे.