मनविसे जिल्हाध्यक्ष कुणाल किनळेकर यांचा आमदार वैभव नाईक यांना सल्ला
*💫कुडाळ दि.१५-:* गावात गावातील विलगीकरण कक्षांच्या उदघाटनासाठी फिरण्यापेक्षा तसेच कुडाळ-मालवणच्या जनतेला नुसतीच उदघाटने निवेदने आणि स्वतः चेच सत्कार सोहळे करून घेऊन बसण्यापेक्षा आमदार वैभव नाईक यांनी प्रत्यक्षात आरोग्य व्यवस्था सुधारुन जनतेचा त्रास कमी करण्यासाठी प्रामाणिकपणे काहीतरी करावे, असा सल्ला मनविसे सिंधुदुर्ग जिल्हाध्यक्ष कुणाल किनळेकर यांनी आमदार वैभव नाईक यांना दिला आहे. किनळेकर म्हणाले, कुडाळ येथील महिला रुग्णालयातील कोविड सेंटरमधील स्टाफ गेले काही दिवस अंतर्गत वादातून काम सोडून गेला आहे. तसेच पुरेसे डॉक्टर सुद्धा उपलब्ध नाहीत. अशा परिस्थितीमुळे रुग्णांचे अतोनात हाल होत आहेत. हे कमी की काय म्हणून एखाद्या वेळी कोविड रुग्णांना ऑक्सीजन किंवा व्हेंटिलेटरची गरज भासल्यास रुग्णांना ऑक्सीजन किंवा व्हेंटिलेटर हे रोजंदारीवर काम करणारे कामगार किंवा स्वतः पेशंटच्या नातेवाईकांना लावावे लागत आहेत. अशी भयंकर परिस्थिती असताना आपले कुडाळ- मालवणचे आमदार मात्र ही परिस्थिती सुधारण्यासाठी काहीतरी करण्याची गरज असताना आपल्या मतदार संघातील ग्रामपंचायतींनी स्वखर्चाने उभारलेल्या विलगीकरण कक्षाचे उदघाटन करण्यात धन्यता मानत आहेत. मुळात कुडाळ महिला रुग्णालयाची तिनशे बेडची क्षमता असुनही सत्तर बेडचेच कोविड सेंटर आमदारांनी मोठ्या गाजावाजात उदघाटन करुन सुरू केले आणि आत्ता ते बंदही करत आहेत, त्याचप्रमाणे मालवण मधील रंगरंगोटी करून उदघाटन करण्यात आलेले कोविड सेंटरही अजून सुरू झालेले नाही. कुडाळ-मालवणच्या जनतेला नुसतीच उद्घाटने निवेदने आणि स्वतः चेच सत्कार सोहळे करून घेऊन बसण्यापेक्षा आमदार नाईक यांनी प्रत्यक्षात आरोग्य व्यवस्था सुधारुन जनतेचा त्रास कमी करावा, असेही किनळेकर म्हणाले.
