शिवसेना संघटक बबन बोभाटे यांचा प्रदीप भालेकर यांना टोला
*💫कुडाळ दि.१५-:* नारायण राणे यांच्याशी असलेला आमचा वैचारिक वाद लढण्यास आम्ही समर्थ आहोत, त्यासाठी भालेकर यांच्यासारख्या शिखंडीची गरज नाही, असा टोला शिवसेना संघटक बबन बोभाटे यांनी प्रदीप भालेकर यांना लगावला आहे. बोभाटे म्हणाले, काही माणसे एवढी स्वार्थी असतात की स्वार्थ साधताना त्यांचा इगो दुखावला की सैरभैर होतात त्यातीलचं एक प्रदीप भालेकर आहेत. आज नारायण राणे आणि शिवसेना हा विषय डोळ्यासमोर ठेऊन भालेकर राजकीय सुरुंग लावण्याचा केविलवाणा प्रयत्न करत आहेत. नारायण राणे यांच्याशी आमचा वैचारिक वाद आहे तो लढण्यास आम्ही समर्थ आहोत, त्यासाठी भालेकर यांच्यासारख्या शिखंडीची गरज नाही, मुळातच कोंकण हा शिवसेनेचा बालेकिल्ला आहे. या बालेकिल्यात भालेकर नावाच्या व्यक्तीला कोण ओळखतही नाही. आज केवळ राजकीय द्वेषापोटी नाहक बदनाम करण्याचा डाव भालेकर करीत आहे. रक्ताचे पाणी करून कोकणातून आपल्या पाठीशी उभे राहिलो, असे म्हणणाऱ्या भालेकराना शिवसेनाच समजली नाही. शिवसेना या शब्दासाठी आणि “बाळासाहेबांच्या विचारांसाठी” “शिवसैनिक” या हेतूने काम करणारे शिवसैनिक हे वेगळेच होते आणि आजही काम करत आहेत. कोकणातील शिवसैनिक तरुणवर्ग हा शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे व शिवसेना यांच्यावर नितांत प्रेम करणारा वर्ग आहे. त्यामुळे कोकण आणि शिवसेना ही घट्ट नाळ तोडण्याची हिम्मत आतापर्यंत कोणाला जमली नाही. नारायण राणेंसारख्या नेत्याला कोकणने कायमचा घरचा रस्ता दाखविला, त्यात प्रदिप भालेकर कोण, असा सवालही बोभाटे यांनी केला. या कोकणची जनता व माझे शिवसैनिक भालेकर यांच्या अशा बोगस कारनाम्यांना सळो की पळो करून सोडतील यात तिळमात्र शंका नाही, त्यामुळे भालेकर यांनी बिनबुडाचे आरोप करू नये. आमचा व नारायण राणे यांच्यात असणाऱ्या राजकीय वादात त्यांनी पडू नये, असा सल्लाही बोभाटे यांनी भालेकर यांना दिला आहे.
