गुरुवारी मध्यरात्री घेतले होते ताब्यात;४ लाख ३६ हजार ५० रूपयाचा मुद्देमाल जप्त
*💫कुडाळ दि.०४-:* शिकारीच्या उद्देशाने बेकायदेशीररित्या बंदुका व काडतुसा घेऊन बाव तिरांबीवाडी येथील जंगलात शिकारीसाठी जाणाऱ्या १६ जणांना स्थानिक गुन्हा अन्वेषण शाखेने सापळा रचुन ताब्यात घेतले. त्यांच्यावर शस्त्र परवान्याचे उल्लंघन केल्याप्रकरणी गुन्हा दाखल केला आहे. तसेच या कारवाईत पाच काडतुसाच्या बंदुका, आठ जिवंत काडतुसे, पाच मोटारसायकली व एक रिक्शा मिळुन सुमारे ४ लाख ३६ हजार ५० रूपयाचा मुद्देमाल जप्त केला आहे. या सर्वांना न्यायालयात हजर केले असता न्यायालयाने सर्वांची जामिनावर मुक्तता केली.
या बाबत कुडाळ पोलिस ठाण्याचे पोलिस निरीक्षक शंकर कोरे यांनी माहिती दिली की, बाव येथील जंगलात शिकारीसाठी काहीजण जाणार आहेत, अशी गोपनीय माहिती मिळाल्यानंतर स्थानिक गुन्हा अन्वेषण पथक व कुडाळ पोलिसांनी संयुक्तरित्या कारवाई करीत गुरूवारी मध्यरात्री तिरांबी देऊळवाडी जवळील जंगलमय भागात शिकारीच्या उद्देशाने बंदुका घेवुन एकत्र जमलेल्या १६ जणांना पोलिसांनी ताब्यात घेतले. यावेळी अधिक तपासणी केली असता त्यांच्याकडे तसेच वाहनात ठेवलेल्या पाच काडतुसाच्या बंदुका व पाच जिवंत काडतुसे सापडली. हे सर्वजण शिकारीला जात होते..त्यामुळे या सर्वांना कुडाळ पोलिस ठाण्यात आणण्यात आले.
या मधील तिघांनी शेती संरक्षणाचा परवानाच्या बंदुका असल्याचे सांगितले. मात्र हे सर्वजण शिकारीच्या उद्देशाने जात असल्याने कुडाळ पोलिसांनी शिकारीच्या उद्देशाने बेकायदेशिररीत्या बंदुका, काडतुसे, वाहने आपल्या ताब्यात घेऊन जमत त्यांनी शस्त्र परवान्याचे उल्लंघन केल्याप्रकरणी गुन्हा दाखल केला.
सुहास सुर्वे (२८, पुजारेवाडी सरंबळ), बुधाजी धुरी (५५, वाडीवरवडे क्षेत्रफळ वाडी), राजन नारिंग्रेकर (४२ नेरुर तर्फ हवेली चव्हाटा), उदय बाने ( ४४, नाबरवाडी,कुडाळ), स्वप्निल सावंत (३०, रा. पेंडूर रायवाडी), सदाशिव नाईक (४९, रा. माणगाव कांदोळी देऊळवाडी), निखिल वाईरकर (२४, रा. कट्टा वाईरकरवाडी), जिवबा पालव, (३०, रा. बांबुळी देऊळवाडी), तेजस बाणे (१९, रा. नाबरवाडी), संतोष बाणे (४९, नाबरवाडी), लक्ष्मण बावकर (२०, रा. बांव, देऊळवाडी), शेखर माळकर (वय- ३०, रा. बांबुळी देऊळवाडी), सुबोध राऊळ (वय 35 रा. नाबरवाडी), श्रीधर बांबुळकर (१९, बांबूळी देऊळवाडी), सौरभ वालावलकर (२०, रा. पेंडूर तेलीवाडी), सचिन सावंत (२८ रा. पेंडूर रायवाडी) यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तसेच पोलिसांनी या प्रकरणी सहा काडतुसाच्या बंदुका, आठ काडतुसे, पाच मोटारसायकल, एक रिक्शा मिळुन सुमारे ४ लाख ३६ हजार 50 रूपयाचा मुद्देमाल जप्त केला आहे. ही कारवाई स्थानिक गुन्हा अन्वेषण शाखेचे निरीक्षक सुनील नलावडे यांच्या मार्गदर्शनाखाली उपनिरीक्षक, शाहू देसाई, सचिन शेळके, व पोलीस अंमलदार सुधीर सावंत, गुरुनाथ कोयंडे, आशिष गंगावणे, प्रमोद काळसेकर, प्रथमेश गावडे, चंद्रकांत पालकर, रवि इंगळे, चंद्रहास नार्वेकर यांनी केली.
या प्रकरणाचा अधिक तपास कुडाळ पोलिस ठाण्याचे पोलिस निरीक्षक शंकर कोरे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस सहाय्यक निरीक्षक राजेंद्र हुलावळे करीत आहेत.