80 टक्के कलमांना पालवी; जानेवारीमध्ये मोहोर येण्याची शक्यता
*💫बांदा दि.०४-:* बागायतदारांचे अर्थकारण अवलंबून असलेल्या हापूस आंब्याला थंडीमुळे काही ठिकाणी मोहोर येण्यास सुरूवात झाली आहे. सिंधुदुर्गात पावसाळा लांबल्याने हिवाळ्याचेही आगमन उशिराने झाले आहे. गेले दोन दिवस पहाटे चांगले धुके पडत असून थंडीही पडू लागल्यामुळे आंबा बागायतदारांच्या आशा पल्लवित झाल्या आहेत. जमिनीमध्ये ओलावा टिकून असल्यामुळे सावंतवाडी तालु्नयातील 80 टक्के कलमांना पालवी आली आहे. पालवी जून होण्यासाठी किमान 40 ते 45 दिवसांचा कालावधी लागतो. त्यानंतर मोहोर प्रक्रिया सुरू होते. गेले दोन दिवस थंडी सुरू झाल्यामुळे जानेवारीमध्ये मोहोर प्रक्रिया सुरू होण्याची शक्यता न्हावेली-रेवटेवाडी येथील आंबा बागायतदार सुनिल परब यांनी वर्तविली आहे. जानेवारीमध्ये पारा प्रचंड खाली येतो. नीचांक हवामानामुळे आंब्याच्या मोहोरावर परिणाम होतो. बहुतांश मोहोरावर फळधारणा होत नाही. शिवाय पुनर्मोहोरदेखील होत असल्याने या हंगामात मोहोर आला तर हे दुहेरी संकट शेतकऱ्यांना झेलावे लागणार आहे. मोहोर वाचविण्यासाठी शेतकऱ्यांना वेळोवेळी हवामानाचा अंदाज घेऊन किटक नाशकांची फवारणी करावी लागणार असल्याचे आंबा बागायतदारांनी सांगितले.