काखेला कळसा, गावाला वळसा

कोरोना काळात जिल्हा परिषदेचा कारभार;राष्ट्रवादीच्या काका कुडाळकर यांचे आरोप

कुडाळ : कोविड काळातील जिल्हा परिषदेचा कारभार म्हणजे काखेत कळसा गावाला वळसा, असा झाला आहे, असा आरोप राष्ट्रवादी काँग्रेस महाराष्ट्र राज्य प्रदेश संघटक सचिव व जिल्हा परिषद माजी अध्यक्ष काका कुडाळकर यांनी केला आहे. कुडाळकर म्हणाले, गेले वर्षभर कोरोनाचा थैमान जिल्ह्यात सुरू आहे. सुरुवातीच्या काळात कडक लॉकडाऊनमुळे कोरोनाची साथ आटोक्यात येत होती. परंतु आर्थिक व्यवहाराबाबत मात्र समाजाला मोठी झळ सोसावी लागली होती. यातच रुग्ण संख्या कमी झाल्यावर मात्र सर्व व्यवहार सुरळीत सुरू झाले. लोकांमध्ये गाफीलपणा आला, त्यामुळे आपल्याला भीषण अशा दुसऱ्या लाटेला सामोरे जावे लागले. त्यामुळे जिल्हा आरोग्य यंत्रणेवर ताण पडू लागला, अशावेळी मात्र भाजपच्या अध्यक्ष राजन तेली व अन्य जिल्हा पदाधिकारी मात्र सातत्याने यासाठी जिल्हा प्रशासनाला व जिल्हा आरोग्य यंत्रणेला दोष देत होते. राजन तेली तर वारंवार कोविड सेंटर उभारण्याच्या घोषणा करत होते. तसेच जिल्हा प्रशासनाने जागा उपलब्ध करून द्यावी असाही हट्ट धरून आहेत. तर काही पदाधिकारी आतापर्यंत झालेल्या कोट्यावधी रुपयांच्या निधीच्या खर्चाचा हिशोब विचारत आहेत. वास्तविक पाहता वाढत्या रुग्ण संख्येमुळे जिल्हा आरोग्य यंत्रणा अपुरी पडत होती. अशा वेळी त्याला सहाय्यभूत अशी यंत्रणा उभी करणं आवश्यक आहे. जिल्हा परिषदेची आरोग्य यंत्रणा सक्षम असताना आमचे जिल्हाध्यक्ष अमित सामंत यांनी तातडीने राज्याचे गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड यांच्याकडून ५० कॉटचे सर्व सुविधा असणार कोविड सेंटर मंजूर करुन घेतल. जिल्हा परिषदेने अजूनपर्यंत ग्रामीण भागातून जिल्हा रुग्णालयाकडे येणारा लोंढा थोपवण्याचा प्रयत्न केलेला दिसत नाही. परंतु आज राजन तेली यांच्या भाजपकडे जिल्हा परिषद बरोबरच पंचायत समिती नगरपरिषद एवढी सत्ताकेंद्रे आहेत. केंद्रातील सत्तेचा वरदहस्तही आहे, असे असतात फक्त राज्य शासनाच्या कारभारावर सातत्याने टीका करण्याचं कामच ही मंडळी करत आहेत. आज राजकारणापेक्षा समाजकारणाची गरज जनतेला आहे, हे विसरु नये, असेही कुडाळकर म्हणाले.

You cannot copy content of this page