मालवण कोरोनामुक्त करण्यासाठी गतवर्षीचा पॅटर्न राबवा

मालवण पत्रकार समितीची तहसीलदारांकडे आग्रही मागणी

मालवण दि प्रतिनिधी मालवण शहर आणि परिसरात दिवसागणिक कोरोना रुग्णांची संख्या वाढत असून कोरोनाचे वाढते संक्रमण ही चिंताजनक बाब आहे. कोरोना संसर्ग रोखण्यासाठी नियमांची अंमलबजावणी करतानाच प्रभावी उपाययोजनांची गरज आहे. त्यामुळे मालवण कोरोना मुक्तीसाठी गतवर्षीचा पॅटर्न राबवा अशी आग्रही भूमिका मालवण पत्रकार समितीने आज मालवणचे तहसीलदार श्री. अजय पाटणे यांच्याशी झालेल्या चर्चे दरम्यान मांडली. मालवण शहर आणि परिसरात कोरोना रुग्णांची संख्या ही वाढती राहिली आहे. त्याचप्रमाणे मृत्यूचे प्रमाणही भयावह असे आहे. त्यामुळे मालवण कोरोना मुक्तीसाठी आज मालवण पत्रकार समितीने मालवणचे तहसीलदार श्री. अजय पाटणे आणि वैद्यकीय अधिकारी डॉ. बालाजी पाटील यांच्याशी चर्चा केली. यावेळी मालवण पत्रकार समिती अध्यक्ष संतोष गावडे, कोकण विभागीय सचिव नंदकिशोर महाजन, जिल्हा कार्यकारणी सदस्य बंटी केनवडेकर, सचिव कृष्णा ढोलम, प्रफुल्ल देसाई, कुणाल मांजरेकर, प्रशांत हिंदळेकर, मनोज चव्हाण, महेश कदम, अमित खोत, समीर म्हाडगुत आदी उपस्थित होते. यावेळी तहसीलदार अजय पाटणे आणि वैद्यकीय अधिकारी डॉ. बालाजी पाटील यांनी पत्रकारांशी अनौपचारिक चर्चा केली. या चर्चेत पत्रकारांनी मालवण शहर आणि तालुक्यात कोरोनाला आळा घालण्याच्या दृष्टीने काही उपाययोजना सुचविल्या. यामध्ये ज्या भागात कोरोनाचे रुग्ण मोठ्याप्रमाणावर आढळत आहेत ते भाग हॉटस्पॉट म्हणून जाहीर करण्यात यावेत. त्याचप्रमाणे काही कोरोना रुग्ण आणि त्यांचे नातेवाईक खुलेआम घराबाहेर फिरताना दिसत आहेत त्यांच्यावर कारवाई करण्यात यावी. त्याचप्रमाणे आज सर्वत्र सोशल डिस्टनसिंगचा फज्जा उडाला आहे त्यासाठी जनजागृती करावी तसेच रुग्णवाढ लक्षात घेऊन तपासणी मोहीम गतिमान करावी. त्याचप्रमाणे ज्या भागात जास्त रुग्ण आढळत आहेत त्या परिसरातील व्यक्तींची रॅपिड टेस्ट न करता आरटीपीसीआर टेस्ट करावी जेणेकरून रुग्णांचे निदान योग्यपद्धतीने होऊन वेळेवर उपचार झाल्याने रुग्ण कोरोना मुक्त होईल. तालुक्यातील कोविड सेंटर, ऑक्सिजन सेंटर येथील व्यवस्था, आरोग्य सुविधा रुग्णसंख्येच्या तुलनेत पुरेशी आहे का याची खात्री करा. तेथील सोई सुविधा यांचाही तपासणी अहवाल घ्यावा. त्या बरोबर कोरोना रुग्ण असलेले व्यक्ती गृह विलगिकरणात असतील तर त्या ठिकाणी कोरोना खबरदारी नियमांची अंमलबजावणी योग्य पद्धतीने होत आहे का नाही याची खात्री व पाहणी संबंधित यंत्रणेकडून होणे गरजेचे असल्याचे मत पत्रकार समितीच्या सदस्यांनी व्यक्त केले फोटो : मालवण तहसीलदार अजय पाटणे यांच्याशी चर्चा करताना मालवण पत्रकार समिती अध्यक्ष संतोष गावडे.

You cannot copy content of this page