थोर नेते, समाजसुधारक आणि कर्तृत्ववान महिलांच्या वेशभूषेतून विद्यार्थ्यांनी जागविला सामाजिक जाणीवांचा जागर; केंद्रप्रमुख ज्योत्स्ना देसाई यांच्याकडून विद्यार्थ्यांचे कौतुक..

⚡बांदा ता.१०-: सह्याद्रीच्या दुर्गम भागातील जिल्हा परिषद प्राथमिक शाळा घारपी येथे सेवा संकल्प अभियानांतर्गत वेशभूषा स्पर्धेचे आयोजन करण्यात आले. या स्पर्धेत विद्यार्थ्यांनी विविध थोर नेते, समाजसुधारक आणि कर्तृत्ववान महिलांच्या वेशभूषा साकारून उपस्थितांचे लक्ष वेधून घेतले. आकर्षक वेशभूषा, आत्मविश्वासपूर्ण सादरीकरण आणि महापुरुषांच्या कार्याची ओळख करून देणाऱ्या सहभागातून विद्यार्थ्यांनी आपल्या कलागुणांचे दर्शन घडविले.
या उपक्रमातून विद्यार्थ्यांना थोर व्यक्तींच्या महान कार्याची, सामाजिक योगदानाची आणि प्रेरणादायी विचारांची ओळख झाली. अशा उपक्रमांमुळे विद्यार्थ्यांमधील सर्जनशीलता, आत्मविश्वास, अभिव्यक्तिकौशल्य आणि सामाजिक जाणीव विकसित होण्यास मदत होते. पाठ्यपुस्तकातील ज्ञानासोबतच महापुरुषांचे विचार विद्यार्थ्यांच्या मनावर रुजविण्याच्या दृष्टीने हा उपक्रम महत्त्वपूर्ण ठरला.
या स्पर्धेतील यशस्वी विद्यार्थ्यांचे केंद्रप्रमुख ज्योत्स्ना देसाई यांनी कौतुक करून त्यांना प्रोत्साहन दिले. विद्यार्थ्यांनी अशा उपक्रमांमध्ये उत्स्फूर्त सहभाग नोंदवून आपल्या कलागुणांना अधिकाधिक वाव द्यावा, अशी प्रेरणा त्यांच्या कौतुकातून मिळाली.
कार्यक्रम यशस्वीरीत्या पार पाडण्यासाठी शाळेचे मुख्याध्यापक जे. डी. पाटील तसेच सहकारी शिक्षक आशिष तांदुळे आणि धर्मराज खंडागळे यांनी विशेष परिश्रम घेतले. विद्यार्थ्यांच्या सुप्त कलागुणांना वाव देत त्यांच्यामध्ये सामाजिक बांधिलकी, महापुरुषांविषयी आदर आणि समाजाप्रती संवेदनशीलता निर्माण करण्याचा संदेश या उपक्रमातून देण्यात आला.
