Headlines

पुनर्रचित हवामान आधारित फळपीक विमा योजनेत सहभागी व्हा

जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी यांचे आवाहन

सिंधुदुर्ग, दि. ६ : बदलत्या हवामानाचा फळपिकांच्या उत्पादनावर होणारा परिणाम लक्षात घेता शेतकऱ्यांना हवामान धोक्यांपासून आर्थिक संरक्षण देण्यासाठी कृषी विभागामार्फत पुनर्रचित हवामान आधारित फळपीक विमा योजना राबविण्यात येत आहे. सन २०२६-२७ मध्ये सिंधुदुर्ग जिल्ह्यात या योजनेअंतर्गत आंबा, काजू व केळी या फळपिकांसोबतच यावर्षीपासून नारळ व सुपारी या फळपिकांचाही समावेश करण्यात आला आहे. जिल्ह्यातील लोकप्रतिनिधी आणि कृषी विभागाने शासनाकडे केलेल्या सातत्यपूर्ण पाठपुराव्यामुळे आंबा पिकासाठी विमा संरक्षणाचा कालावधीही १५ मे ऐवजी ३१ मेपर्यंत वाढविण्यात आला आहे. त्यामुळे जिल्ह्यातील पात्र फळबागायतदार शेतकऱ्यांनी या योजनेत सहभागी व्हावे, असे आवाहन जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी भाग्यश्री नाईकनवरे यांनी केले आहे.

सन २०२६-२७ मधील आंबिया बहारासाठी योजनेत सहभागी होण्याची प्रक्रिया दि. २ ऑक्टोबर २०२६ पासून सुरू झाली आहे. नारळ व सुपारी पिकांसाठी दि. ३१ ऑक्टोबर २०२६, तर आंबा व काजू पिकांसाठी दि. ३० नोव्हेंबर २०२६ ही सहभागाची अंतिम मुदत आहे. अंतिम मुदतीच्या काळात होणारी गर्दी, तांत्रिक अडचणी किंवा कागदपत्रांची पूर्तता करण्यासाठी होणारी धावपळ टाळण्यासाठी शेतकऱ्यांनी अंतिम तारखेची वाट न पाहता लवकरात लवकर विमा नोंदणी करून घ्यावी.

अधिसूचित महसूल मंडळातील फळबागांना विमा संरक्षण

सिंधुदुर्ग जिल्ह्यात अधिसूचित करण्यात आलेल्या महसूल मंडळांमध्ये असलेल्या उत्पादनक्षम आंबा, काजू व केळी फळबागांना योजनेअंतर्गत विमा संरक्षण देण्यात येते. चालू वर्षापासून अधिसूचित महसूल मंडळांमध्ये नारळ आणि सुपारी पिकांनाही विमा संरक्षण उपलब्ध करून देण्यात आले आहे. बदलते तापमान, अवेळी पाऊस, अतिवृष्टी, कमी पाऊस, गारपीट, वेगाचा वारा आदी हवामान घटकांमुळे फळपिकांचे नुकसान होण्याची शक्यता असते. अशा परिस्थितीत निर्धारित हवामान प्रमाणके पूर्ण झाल्यास विमाधारक शेतकऱ्यांना नियमानुसार नुकसानभरपाई मिळण्याची तरतूद या योजनेत आहे.

या योजनेत कर्जदार आणि बिगर कर्जदार शेतकऱ्यांचा सहभाग ऐच्छिक आहे. भाडेपट्टीने शेती करणाऱ्या शेतकऱ्यांनी नोंदणीकृत (रजिस्टर्ड) भाडेकराराची प्रत पिक विमा संकेतस्थळावर अपलोड करणे बंधनकारक आहे. कर्जदार शेतकऱ्यांना योजनेत सहभागी व्हायचे नसल्यास सहभागाच्या अंतिम मुदतीच्या किमान सात दिवस अगोदर संबंधित बँकेकडे त्याबाबतचे घोषणापत्र सादर करणे आवश्यक आहे. याबाबत संबंधित बँकेशी संपर्क साधावा.

एका शेतकऱ्यास अधिसूचित फळपिकांसाठी किमान ०.१० हेक्टर ते कमाल ४ हेक्टर क्षेत्रापर्यंत विमा नोंदणी करता येणार आहे.

पिकनिहाय विमा संरक्षण व शेतकरी विमा हप्ता

आंबा पिकासाठी प्रति हेक्टर ₹१ लाख ७० हजार विमा संरक्षित रक्कम असून शेतकरी विमा हप्ता ₹८ हजार ५०० आहे. काजू पिकासाठी विमा संरक्षित रक्कम ₹१ लाख २० हजार असून विमा हप्ता ₹६ हजार प्रति हेक्टर आहे. केळी पिकासाठी ₹१ लाख ७० हजार विमा संरक्षित रक्कम आणि ₹८ हजार ५०० प्रति हेक्टर शेतकरी हप्ता आहे.

यावर्षी योजनेत समाविष्ट करण्यात आलेल्या नारळ पिकासाठी ₹१ लाख ७० हजार विमा संरक्षित रक्कम असून शेतकरी विमा हप्ता ₹८ हजार ५०० प्रति हेक्टर आहे. सुपारी पिकासाठी ₹१ लाख विमा संरक्षित रक्कम असून शेतकरी विमा हप्ता ₹५ हजार प्रति हेक्टर आहे.

हवामान केंद्रावरील नोंदींच्या आधारे नुकसानभरपाई

योजनेअंतर्गत महसूल मंडळनिहाय स्थापित करण्यात आलेल्या स्वयंचलित हवामान केंद्रांद्वारे पर्जन्यमान, तापमान, वाऱ्याचा वेग, आर्द्रता आदी हवामान घटकांची माहिती स्वयंचलितरीत्या नोंदविली जाते. शासन निर्णयामध्ये प्रत्येक फळपिकासाठी निश्चित करण्यात आलेल्या कालावधीत संबंधित हवामान धोका निर्धारित प्रमाणकानुसार लागू झाल्यास विमाधारक शेतकऱ्यांना नियमानुसार नुकसानभरपाई देय होते.

आंबा पिकासाठी दि. १ डिसेंबर ते ३१ मार्च तसेच दि. १ एप्रिल ते ३१ मे या कालावधीत अवेळी पाऊस, दि. १ जानेवारी ते १० मार्च या कालावधीत कमी तापमान, दि. १ मार्च ते ३१ मे या कालावधीत जास्त तापमान, दि. १६ एप्रिल ते १५ मे या कालावधीत वेगाचा वारा आणि दि. १ डिसेंबर ते ३१ मे या कालावधीत गारपीट या हवामान धोक्यांचा समावेश आहे.

काजू पिकासाठी दि. १ डिसेंबर ते २८ फेब्रुवारी या कालावधीत अवेळी पाऊस व कमी तापमान, तर दि. १ डिसेंबर ते ३१ मे या कालावधीत गारपीट या हवामान धोक्यांचा समावेश करण्यात आला आहे.

केळी पिकासाठी दि. १ नोव्हेंबर ते २८ फेब्रुवारी या कालावधीत कमी तापमान, दि. १ मार्च ते ३१ जुलै या कालावधीत वेगाचा वारा, दि. १ एप्रिल ते ३१ मे या कालावधीत जास्त तापमान तसेच दि. १ डिसेंबर ते ३१ मे या कालावधीत गारपीट या हवामान धोक्यांचा समावेश आहे.

नारळ आणि सुपारी या दोन्ही पिकांसाठी दि. १ नोव्हेंबर ते ३१ मे या कालावधीत वेगाचा वारा, दि. १ जानेवारी ते ३१ मार्च या कालावधीत जास्त तापमान तसेच दि. १ जून ते ३० सप्टेंबर या कालावधीत जास्त पाऊस व जास्त आर्द्रता आणि कमी पाऊस या हवामान प्रमाणकांचा समावेश आहे.

नुकसानाची माहिती ७२ तासांत देणे आवश्यक

योजनेअंतर्गत वेगाचा वारा किंवा गारपीट होऊन फळपिकांचे नुकसान झाल्यास संबंधित विमाधारक शेतकऱ्यांनी ७२ तासांच्या आत विमा कंपनी अथवा कृषी विभागास नुकसानीची माहिती देणे आवश्यक आहे. त्यामुळे अशा प्रकारचे नुकसान झाल्यानंतर शेतकऱ्यांनी विलंब न करता संबंधित यंत्रणेशी संपर्क साधावा.

Farmer ID व ई-पिक पाहणीची नोंद बंधनकारक

पिक विमा योजनेत सहभागी होण्यासाठी Agristack अंतर्गत ‘शेतकरी ओळखपत्र क्रमांक (Farmer ID)’ असणे बंधनकारक आहे. तसेच संबंधित फळपिकाची नोंद ई-पिक पाहणी DCS मोबाईल ॲपमध्ये करणे आवश्यक आहे. त्यामुळे ज्या शेतकऱ्यांनी अद्याप Farmer ID प्राप्त केलेला नाही किंवा ई-पिक पाहणीमध्ये आपल्या फळपिकाची नोंद केलेली नाही, त्यांनी संबंधित प्रक्रिया वेळेत पूर्ण करून घ्यावी.

विमा अर्जासोबत फळबागेचा Geo Tagging असलेला फोटो विमा पोर्टलवर अपलोड करणे अनिवार्य आहे. यामुळे विमा नोंदणी करताना आवश्यक कागदपत्रे, पिकाची नोंद आणि क्षेत्राची माहिती अचूक असणे आवश्यक आहे.

CSC, बँक किंवा ऑनलाइन विमा हप्ता भरण्याची सुविधा

योजनेचा शेतकरी विमा हप्ता आपले सरकार सेवा केंद्र (CSC), संबंधित बँक किंवा www.pmfby.gov.in या संकेतस्थळावर ऑनलाइन पद्धतीने भरता येणार आहे. शेतकऱ्यांनी विमा अर्ज भरताना आपल्या फळपिकाची नोंद, क्षेत्र, Farmer ID, आवश्यक कागदपत्रे आणि Geo Tagging फोटो यांची पूर्तता करावी.

फळपिकांना हवामानाच्या बदलत्या परिस्थितीमुळे निर्माण होणाऱ्या जोखमीपासून आर्थिक संरक्षण मिळवून देण्याच्या दृष्टीने ही योजना शेतकऱ्यांसाठी महत्त्वपूर्ण आहे. त्यामुळे पात्र शेतकऱ्यांनी योजनेची माहिती घेऊन आपल्या फळपिकाचा विमा वेळेत काढून घ्यावा. योजनेच्या अधिक माहितीसाठी आपल्या गावातील सहाय्यक कृषी अधिकारी, कृषी सहाय्यक अथवा तालुका कृषी कार्यालयाशी संपर्क साधावा, असे आवाहन जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी भाग्यश्री नाईकनवरे यांनी केले आहे.

अंतिम मुदती लक्षात ठेवा :
नारळ व सुपारी – ३१ ऑक्टोबर २०२६
आंबा व काजू – ३० नोव्हेंबर २०२६

००००००

You cannot copy content of this page