चक्रीवादळातील नुकसानीचे केलेले पंचनामे दिखाऊ…

कोकणी मेव्या साठी कच्चामाल देणाऱ्या झाडाचा समावेश करा; जिल्हाधिकाऱ्यांकडे भाजप उद्योग व्यापार जिल्हाध्यक्ष विजय केनवडेकर यांची मागणी*

*💫मालवण दि.०४-:* कोकणातील तौक्ते वादळामुळे झालेले नुकसान दुरगामी असून नुकसानीचे वरवरचे पंचनामे दिखाऊ आहेत. तौक्ते चक्रीवादळात कोकणातील फणस, जांभूळ, कोकम (रतांबे), तिरफळे, वावडिंग, सुरंगी,करवंदे आदी उत्पन्न मिळवून देणाऱ्या झाडांचेही नुकसान झाले आहे. त्यामुळे वादळ नुकसान भरपाईत कोकणी मेव्यासाठी आवश्यक असणाऱ्या अशा कच्च्या मालाची झाडेही समाविष्ट करण्यात यावीत, अशी मागणी भाजप उद्योग व्यापार आघाडी सिंधुदुर्गचे जिल्हाध्यक्ष विजय केनवडेकर यांनी जिल्हाधिकारी के. मंजुलक्ष्मी यांच्याकडे केली आहे. कोकण किनारपट्टीवर तौक्ते वादळात झालेले नुकसान, घराची पडझड, माड-आंबा काजु झाडे नुकसान एवढेच सिमित पंचनामे केले गेले आहेत. सरकार जाहीर करत असलेली नुकसान भरपाई यांचीच दिली जाते. आंबा, काजु, नारळ आणि सुपारी यांच्यावर अर्थकारण असले तरी कोकणाचे ग्रामीण अर्थकारण फणस, जांभूळ, कोकम (रतांबे), तिरफळे, वावडिंग, सुरंगी, करवंदे यांच्यावर पण अवलंबून असते. यांच्याकडे कृषी विभाग किंवा शासन गांभीर्याने पाहत नाही. कोकण कृषी विद्यापीठ याच्या वर श्वेतपञिका काढणे आवश्यक आहे. वरील फळाचे नुकसान कोकणात समाविष्ट करणे आवश्यक आहे. वादळात बरीच रतांबे, फणस, सुरंगी, तिरफळे यांची झाडे जमीनदोस्त झाली आहेत. या झाडाची शेतकऱ्यास मशागत करावी लागत नसली तरी ही उत्पन्न देणारी झाडे आहेत. पर्यटन व्यवसायाला पुरक व्यवसाय म्हणुन कोकणी मेव्याला मोठी मागणी आहे. कोकणी मेव्याचे छोटे-मोठे प्रकल्प महिला व तरुणांनी सुरु केले आहेत. वादळाच्या नुकसानाने कोकणी मेव्याचा कच्चा माल मिळणे कठीण झाले आहे, असे विजय केनवडेकर यांनी म्हटले आहे. आंब्याची नुकसानी झाडाच्या पडझडीवर केली आहे. तसे न करता पूर्ण बागेच्या नुकसानीचे सर्व पंचनामे करणे आवश्यक आहे. कारण वादळात लागलेल्या पावसाने फळ माशीचे प्रमाण वाढल्याने झाडावरील आंब्याला फळ माशीने दंश केल्याने पूर्ण आंबा काळा पडून आंब्यामध्ये किड निर्माण होऊन आंबा सिझनात मोठे नुकसान झाले आहे. यामुळे पडझडीचे पंचनामे न करता सरसकट पंचनामे करुन नुकसान भरपाई शेतकरी,बागायतदार यांना देण्यात यावी. कोकण कृषी विद्यापीठ व कृषी विभागाकडून विशेष नुकसान अहवाल तयार करुन शासनाकडे सादर करावा, अशी मागणी विजय केनवडेकर यांनी केली आहे.

You cannot copy content of this page