प्रतीक वाळके यांचा दुर्दैवी अंत; मित्र गंभीर जखमी, धोकादायक झाड हटविण्यास दिरंगाई झाल्याचा ग्रामस्थांचा आरोप..
⚡कणकवली ता.१५-: असलदे येथे दुचाकीवरून प्रवास करणाऱ्या दोन युवकांच्या अंगावर अचानक मोठे झाड कोसळल्याची धक्कादायक घटना मंगळवारी (१५ सप्टेंबर) दुपारी सुमारे २ वाजण्याच्या सुमारास घडली. या दुर्घटनेत प्रतीक प्रकाश वाळके (वय २८, रा. असलदे, मधलीवाडी) यांचा जागीच मृत्यू झाला, तर त्यांच्यासोबत असलेला मित्र गंभीर जखमी झाला. जखमी युवकाला उपचारासाठी कणकवलीतील खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. या घटनेमुळे परिसरात हळहळ व्यक्त होत आहे.
प्रतीक वाळके आणि त्यांचा मित्र अॅक्टीव्हा दुचाकीवरून नांदगाव ते असलदे मधलीवाडी या मार्गावरून जात होते. त्यावेळी रस्त्यालगत असलेले जुने झाड अचानक त्यांच्या दुचाकीवर कोसळले. झाडाच्या मोठ्या फांद्यांखाली दोघेही अडकले. अचानक घडलेल्या या दुर्घटनेमुळे परिसरात एकच खळबळ उडाली.
घटनेची माहिती मिळताच स्थानिक ग्रामस्थांनी तातडीने घटनास्थळी धाव घेतली. ग्रामस्थांनी झाडाच्या फांद्या बाजूला करून दोन्ही युवकांना बाहेर काढले. मात्र, या दुर्घटनेत प्रतीक वाळके यांचा जागीच मृत्यू झाला होता. गंभीर जखमी झालेल्या त्यांच्या मित्राला तातडीने कणकवलीतील खासगी रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले. या घटनेनंतर कणकवली-देवगड मार्गावरील वाहतूक काही काळ ठप्प झाली होती.
दरम्यान, नांदगाव-देवगड मार्गाच्या काँक्रिटीकरणाचे काम सध्या सुरू आहे. या कामादरम्यान रस्त्यालगतची अनेक झाडे हटविण्यात आली आहेत. असलदे येथील हे जुने झाड धोकादायक असल्याने ते हटविण्याची मागणी स्थानिक नागरिकांकडून करण्यात आली होती, असा दावा ग्रामस्थांनी केला आहे. मात्र, संबंधित ठेकेदार कंपनीकडून झाड हटविण्यास दिरंगाई झाल्याने ही दुर्घटना घडल्याचा आरोप संतप्त ग्रामस्थांनी केला.
या दुर्घटनेनंतर ग्रामस्थांनी संबंधित अधिकाऱ्यांकडे मृत प्रतीक वाळके यांच्या कुटुंबीयांना तातडीने मदत मिळवून देण्याची मागणी केली आहे. तसेच ठेकेदार कंपनीनेही मृताच्या कुटुंबीयांना आर्थिक मदत द्यावी, अशी मागणी करण्यात आली आहे. धोकादायक झाडांबाबत पूर्वसूचना देऊनही त्याकडे दुर्लक्ष झाले असल्यास संबंधितांवर जबाबदारी निश्चित करावी, अशी मागणीही ग्रामस्थांकडून होत आहे.
या घटनेमुळे रस्त्यालगत असलेल्या धोकादायक झाडांचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आला असून, भविष्यात अशा दुर्घटना टाळण्यासाठी संबंधित विभागाने तातडीने उपाययोजना कराव्यात, अशी मागणी होत आहे.
