Headlines

बांद्यात १९ सप्टेंबरला गणपती अथर्वशीर्ष पठण सोहळा

संत समाज तोरसे-मोप व सार्वजनिक गणेश मंडळाचा उपक्रम

बांदा/प्रतिनिधी
श्री दत्त पद्मनाभ पीठ, श्री क्षेत्र तपोभूमी संचालित संत समाज तोरसे-मोप तथा श्री सार्वजनिक गणेश मंडळ, बांदा यांच्या संयुक्त विद्यमाने श्री गणपती अथर्वशीर्ष पठण सोहळ्याचे आयोजन करण्यात आले आहे. श्री दत्त पद्मनाभ पीठ, तपोभूमीचे पीठाधीश्वर परमपूज्य सद्गुरू ब्रह्मेशानंद आचार्य स्वामीजी यांच्या गुरुपीठारोहण रजत महोत्सवी वर्षानिमित्त हा धार्मिक कार्यक्रम होणार आहे.
शनिवार दिनांक १९ रोजी सायंकाळी सात वाजता बांदा येथील श्री विठ्ठल मंदिरात हा अथर्वशीर्ष पठण सोहळा संत समाज तोरसे-मोप यांच्या यजमानपदाखाली संपन्न होणार आहे. अकरा दिवसीय गणेशोत्सवानिमित्त आयोजित या धार्मिक उपक्रमात संत समाजातील गुरुबंधू-भगिनी तसेच भाविक मोठ्या संख्येने सहभागी होणार आहेत.
गणपती अथर्वशीर्ष पठणातून श्री गणरायाची सामूहिक आराधना करून सद्गुरुस्वरूप श्री गणपती बाप्पाच्या चरणी सेवा समर्पित करण्याचा उद्देश या सोहळ्यामागे आहे. धार्मिक व आध्यात्मिक वातावरणात हा कार्यक्रम पार पडणार असून सर्व गुरुबंधू-भगिनी आणि भाविकांनी उपस्थित राहून या सेवेत सहभागी व्हावे, असे आवाहन आयोजकांतर्फे करण्यात आले आहे.
‘सद्गुरूंच्या कृपाशीर्वादाने आणि श्री गणरायाच्या भक्तिभावाने आयोजित या सामूहिक अथर्वशीर्ष पठण सोहळ्यात सर्वांनी सहभागी होऊन आपली सेवा समर्पित करावी,’ असे आवाहन संत समाज तोरसे-मोप व श्री सार्वजनिक गणेश मंडळ, बांदा यांनी केले आहे.

You cannot copy content of this page