हिंदू कॉलनी रहिवासी व कुडाळ हितचिंतकांच्या लढ्याला प्राथमिक यश:नगरपंचायतीला प्रतिवादी म्हणून उभे राहावे लागणार..
⚡कुडाळ ता.१५-: स्वतःच्या मालकीच्या जागेच्या हक्कासाठी तसेच कुडाळ शहराच्या हितासाठी ‘त्या’ १४१ गुंठे जमिनी संदर्भात हिंदू कॉलनी रहिवासी व कुडाळ शहर हितचिंतकांनी सुरू केलेल्या लढ्याला प्राथमिक यश मिळाले आहे. कुडाळ नगरपंचायतीने उच्च न्यायालयात दाद मागण्याबाबत घेतलेल्या भूमिकेविरोधात दाखल करण्यात आलेल्या रिट याचिकेवर मुंबई उच्च न्यायालयाच्या कोल्हापूर खंडपीठाने आतापर्यंतच्या महसूल आदेशांना स्थगिती दिल्याचा दावा हिंदू कॉलनी रहिवासी व कुडाळ हितचिंतकांनी केला आहे. ज्येष्ठ विधिज्ञ अॅड. सतीश तळेकर यांच्या अभ्यासपूर्ण युक्तिवादामुळे हा आदेश मिळाल्याचे त्यांनी प्रसिद्धीपत्रकातून म्हटले आहे.
या प्रकरणी रिट पिटीशन क्रमांक ४३४२/२०२६ दाखल करण्यात आली आहे. दि. १० सप्टेंबर २०२६ रोजी उच्च न्यायालयाने याचिकाकर्त्यांची विनंती मान्य करत स्थगिती आदेश जारी केल्याचे प्रसिद्धीपत्रकात नमूद करण्यात आले आहे. त्यामुळे आता संबंधित प्रकरणात कुडाळ नगरपंचायतीला प्रतिवादी म्हणून न्यायालयीन प्रक्रियेत सहभागी व्हावे लागणार असल्याचेही याचिकाकर्त्यांनी म्हटले आहे.
या प्रकरणाच्या पार्श्वभूमीवर दि. १० जुलै २०२६ रोजी संध्या तेरसे यांनी नगरपंचायतीच्या नावे असलेल्या सुमारे १४१ गुंठे जमिनीबाबत विशेष सभा घेऊन या जमिनीच्या हक्काबाबत पुढील कार्यवाही करण्याची मागणी केली होती. या मागणीसाठी त्यांनी उपोषणही केले होते. त्यानंतर झालेल्या विशेष सभेत २०२४ मध्ये महाराष्ट्र महसूल न्यायाधिकरणात (MRT) झालेल्या निकालाची प्रत उपलब्ध करून घेतल्यानंतर उच्च न्यायालयात दाद मागायची की नाही, याबाबत निर्णय घेण्यात आल्याचे प्रसिद्धीपत्रकात म्हटले आहे.
मात्र, संबंधित निकालाला सुमारे दोन वर्षे उलटूनही पुढील कार्यवाही झाली नसल्याचा आरोप करत हिंदू कॉलनी रहिवासी व कुडाळ शहर हितचिंतकांनी उच्च न्यायालयात धाव घेतली. “दोन वर्षांत नगरपंचायतीला जे करता आले नाही, ते दोन महिन्यांत कुडाळच्या नागरिकांनी करून दाखवले,” असा दावा त्यांनी केला आहे.
कुडाळ शहराच्या हितासाठी सर्वसामान्य नागरिकांनी एकत्र येत पुकारलेल्या या लढ्याला श्री देव कुडाळेश्वर व श्री साईबाबांच्या आशीर्वादाने प्राथमिक यश मिळाले असून, हे यश सर्व देवतांच्या चरणी अर्पण करीत असल्याचेही प्रसिद्धीपत्रकात नमूद करण्यात आले आहे.
सुजाण नागरिकांनी एकत्र येऊन आपल्या हक्कासाठी प्रामाणिकपणे प्रयत्न केल्यास निश्चितच सकारात्मक परिणाम मिळू शकतो, असा विश्वास हिंदू कॉलनी रहिवासी व कुडाळ शहर हितचिंतकांनी व्यक्त केला आहे.
या संपूर्ण प्रकरणाबाबत गणेशोत्सवानंतर सविस्तर पत्रकार परिषद घेण्यात येणार असल्याचेही त्यांनी सांगितले आहे.
