डॉ. विशाल रेड्डी: अभिनव फाऊंडेशन सामाजिक बांधिलकीचे निवेदन..
⚡सावंतवाडी, ता.१३-: गणेशोत्सवात आरोग्य व्यवस्था सज्ज आहे. लोकांची कोणतीही गैरसोय होऊ देणार नाही असे आश्वासन सावंतवाडी उपजिल्हा रूग्णालयाचे वैद्यकीय अधिक्षक डॉ. विजय रेड्डी यांनी अभिनव फाऊंडेशन सिंधुदुर्ग आणि सामाजिक बांधिलकी प्रतिष्ठानच्या शिष्टमंडळाला आज दिले.
ट्रामा केअर युनिट आणि रिक्त वैद्यकीय अधिकारी पदासंदर्भात अभिनव फाऊंडेशन सिंधुदुर्ग आणि सामाजिक बांधिलकी प्रतिष्ठान यांच्यावतीने डॉ. रेड्डी यांना निवेदन देण्यात आले. यावेळी अभिनव फाऊंडेशनचे अध्यक्ष किशोर चिटणीस, सचिव अण्णा म्हापसेकर, सामाजिक बांधिलकीचे रवी जाधव, लक्ष्मण कदम,रुपा मुद्राळे, अभिनवचे तुषार विचारे, राजू केळुसकर, सिंधुदुगँ जिल्हा बँकेचे सेवानिवृत्त अधिकारी रविंद्र ओगले आदी उपस्थित होते.
अभिनव फाऊंडेशन सिंधुदुर्ग या संस्थेने उपजिल्हा रुग्णालयासंदर्भात दाखल केलेल्या जनहित याचिके प्रकरणी आरोग्य संचालक यांनी न्यायालयात हमी पत्र दिले आहे. त्यामध्ये सहा महिन्यात रिक्त वैद्यकीय अधिकारी फदे भरण्याची हमी दिली आहे. ट्रामा केअर युनिट संबधीची वैद्यकीय उपकरणे चार आठवड्यात सीआर्म मशीन सहा आठवड्यात देण्याचे अभिवचन दिले आहे. यासंदर्भात कोणती प्रगती झाली,याची विचारणा श्री.ओगले यांनी केली.
त्यावर डॉ. रेड्डी म्हणाले, ट्रामा केअर युनिटसंबधीची कार्यवाही सुरु आहे. याबाबत वरिष्ठ अधिकारी यांची बैठक झाली आहे. गणेशोत्सव काळात पुरेपुर क्षमतेने वैद्यकीय सेवा दिली जाईल. त्यासाठी प्रशासन सज्ज आहे.
चौकट
येत्या काही दिवसात सावंतवाडी. उपजिल्हा रुग्णालयात पाच नियमित वैद्यकीय अधिकारी मिळतील. त्यापैकी एका नेत्रतज्ञांची आँडर आली आहे. अजून चार तज्ञ डॉक्टर मिळतील. स्त्रिरोगतज्ञ, नाक.कान, घसा तज्ञ, त्वचाविकार तज्ञ, आहारतज्ञ, भुलतज्ञ, स्त्रिरोगतज्ञ अशी काही पदे भरली जातील. सप्टेंबर अखेर हे चित्र स्पष्ट होईल, असे डॉ. रेड्डी यांनी सांगितले.
