आमदार दीपक केसरकर यांच्या पाठपुराव्याला यश; नगरपालिका व धारगळ आयुर्वेदिक संस्थेत सामंजस्य करार..
⚡सावंतवाडी, ता. १५-: सावंतवाडी शहर व परिसरातील नागरिकांना आयुर्वेदिक उपचारांची अधिक चांगली सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी सावंतवाडी नगरपरिषद आणि गोवा येथील धारगळ येथील अखिल भारतीय आयुर्वेदिक संस्थान यांच्या माध्यमातून आयुष ओपीडी सुरू करण्याबाबत सामंजस्य करार (MOU) करण्यात आला. या माध्यमातून नागरिकांना मोफत ओपीडी सेवा तसेच औषधे व आवश्यक उपकरणांची सुविधा उपलब्ध होणार आहे.
आयुष ओपीडी सुरू करण्यासाठी आमदार दीपक केसरकर यांनी गेल्या काही महिन्यांपासून पाठपुरावा केला होता. त्यांच्या माध्यमातून आयुष मंत्रालयाशी संपर्क साधण्यात आला. आयुष मंत्रालयाचे संचालक प्रा. डॉ. प्रदीपकुमार प्रजापती यांनी या प्रस्तावाला सकारात्मक प्रतिसाद दिल्यानंतर ओपीडी सुरू करण्याचा मार्ग मोकळा झाला. सावंतवाडी नगरपरिषदेने त्यासाठी जागा उपलब्ध करून दिली आहे.
यावेळी बोलताना आमदार दीपक केसरकर म्हणाले की, महाराष्ट्रातील पहिल्या आयुष ओपीडीपैकी एक सुविधा सावंतवाडीत सुरू होत आहे, ही अभिमानाची बाब आहे. यासाठी केंद्रीय आयुष मंत्री प्रतापराव जाधव यांचेही विशेष श्रेय आहे. गोवा येथे आयुषच्या माध्यमातून मोठ्या प्रमाणात आरोग्य सुविधा उभारण्यात आल्या असून, माजी केंद्रीय आयुष मंत्री श्रीपाद नाईक यांनी त्याला पूर्णत्व दिले. धारगळ येथील संस्थेच्या माध्यमातून सिंधुदुर्गातील सुमारे ४० टक्के रुग्ण उपचारासाठी येत असल्याचेही त्यांनी नमूद केले.
सावंतवाडी ही आयुर्वेदिक उपचारांची परंपरा असलेली भूमी आहे. शहरात आयुर्वेदिक मेडिकल कॉलेज असून, नगरपालिकेचा आयुर्वेदिक दवाखानाही चांगल्या प्रकारे सुरू आहे. त्यामुळे आयुष ओपीडी सुरू झाल्याने या क्षेत्राला आणखी चालना मिळेल. भविष्यात पंचकर्म, योगा सेंटर, वेलनेस सेंटर तसेच हेल्थ पार्क यांसारख्या सुविधा सावंतवाडीत विकसित करण्याचा विचार करावा, अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली.
दोडामार्ग एमआयडीसीतील सुमारे ५० एकर जमीन आयुष मंत्रालयासाठी उपलब्ध करून देण्यात आली असून, त्या ठिकाणी विविध आरोग्यविषयक सुविधा निर्माण करण्याचा विचार व्हावा, असेही केसरकर यांनी सांगितले. पर्यटन जिल्ह्यात आरोग्य पर्यटनाला चालना देण्यासाठी सावंतवाडीमध्ये आयुर्वेदिक व वेलनेस सुविधांचा विस्तार महत्त्वाचा ठरेल, असे त्यांनी स्पष्ट केले.
नगरपालिकेच्या कामकाजाबाबत बोलताना केसरकर यांनी शहरातील बाजारपेठ, पार्किंग आणि स्टॉलच्या प्रश्नावरही भाष्य केले. सावंतवाडी स्टॉलमुक्त करण्याबरोबरच पक्की दुकाने उपलब्ध करून देण्याचा विचार करावा, अशी सूचना त्यांनी नगराध्यक्षांना केली. बाजारपेठेसाठी सुमारे ९ कोटी रुपयांचा निधी देण्यात आला असून, बाजारपेठ पूर्ण झाल्यानंतर पार्किंगची सुविधाही उपलब्ध होईल, असे त्यांनी सांगितले. प्रशासकीय काळात शहराच्या विकासाकडे झालेले दुर्लक्ष भरून काढण्यासाठी यावर्षी उपलब्ध सुमारे २२ कोटी रुपयांचा निधी विकासकामांवर खर्च करावा, असे आवाहनही त्यांनी केले.
आयुष मंत्रालयाचे संचालक प्रा. डॉ. प्रदीपकुमार प्रजापती यांनी सांगितले की, सावंतवाडीतील नागरिकांची आयुष ओपीडीची मागणी होती. आमदार दीपक केसरकर व त्यांच्या टीमने हा विषय सातत्याने लावून धरला. जागा उपलब्ध झाल्यानंतर आयुषच्या माध्यमातून आणखी सुविधा वाढविण्यात येतील. आयुर्वेदामध्ये मोठी ताकद असून, जुन्या व्याधींसह विविध आजारांवर उपचार तसेच आवश्यक शस्त्रक्रिया धारगळ येथील संस्थेच्या माध्यमातून उपलब्ध आहेत. सावंतवाडीतील ओपीडीला मिळणारा प्रतिसाद पाहून भविष्यात विशेष सेवा वाढविण्यात येतील.
धारगळ येथील अखिल भारतीय आयुर्वेदिक संस्थानच्या डीन डॉ. सुजाता कदम यांनीही सावंतवाडीमध्ये आयुष ओपीडी सुरू होत असल्याबद्दल समाधान व्यक्त केले. सावंतवाडी व आसपासच्या नागरिकांसाठी ही सुविधा उपयुक्त ठरेल. ओपीडीच्या माध्यमातून प्राथमिक सेवा सुरू करून टप्प्याटप्प्याने पंचकर्म व अन्य विशेष सुविधा उपलब्ध करून देण्याचा प्रयत्न राहणार असल्याचे त्यांनी सांगितले.
सावंतवाडीच्या नगराध्यक्षा श्रद्धा भोसले म्हणाल्या की, नागरिकांच्या आरोग्याच्या दृष्टीने आयुष ओपीडी सुरू करण्याचा निर्णय महत्त्वपूर्ण आहे. नगरपालिकेने यासाठी जागा उपलब्ध करून दिली असून, दोन्ही आरोग्य सुविधा कार्यान्वित करण्यासाठी प्रयत्न सुरू आहेत. पालिकेचा आयुर्वेदिक दवाखानाही लवकरच सुरू करण्यात येईल. आयुष ओपीडी सुरू झाल्यानंतर नागरिकांना मोठा फायदा होणार आहे.
प्रा. विनायक चकोते यांनी सांगितले की, सुमारे सात महिन्यांपूर्वी आमदार दीपक केसरकर यांच्या माध्यमातून आयुष ओपीडी सुरू करण्याबाबत प्रक्रिया सुरू झाली. सुरुवातीला उपजिल्हा रुग्णालयातील जागेचा विचार करण्यात आला; मात्र जागा अपुरी असल्याने नगरपरिषदेने उपलब्ध करून दिलेली जागा निश्चित करण्यात आली. सामंजस्य करारानंतर ओपीडीची सुविधा प्रत्यक्षात सुरू करण्याचा मार्ग मोकळा झाला आहे.
ओपीडीसाठी आवश्यक औषधे व उपकरणे आयुष संस्थेकडून उपलब्ध करून दिली जाणार असून, इमारतीची आवश्यक व्यवस्था नगरपरिषदेकडून करण्यात येणार आहे. सुरुवातीला आठवड्यातून मंगळवार व शुक्रवार सेवा देण्याचा विचार असून, नागरिकांचा प्रतिसाद पाहून बालरोगासह विविध स्पेशालिटी सेवा वाढविण्यात येणार आहेत. भविष्यात पंचकर्म आणि इतर विशेष उपचार सुविधा उपलब्ध करून देण्याचा मानस व्यक्त करण्यात आला.
या वेळी आयुष मंत्रालयाचे संचालक प्रा. डॉ. प्रदीपकुमार प्रजापती, धारगळ येथील डीन डॉ. सुजाता कदम, प्रा. विनायक चकोते, नगराध्यक्षा श्रद्धा भोसले, मुख्याधिकारी विनायक औंधकर यांच्यासह नगरसेवक व संबंधित अधिकारी उपस्थित होते.
