आमदार दीपक केसरकर: ग्रामस्थांना शांतता राखण्याचे आवाहन..
⚡सावंतवाडी ता.१३-: चौकुळ गावातील कबुलायतदार व गावकर जमिनीच्या वाटपाबाबत काही गैरसमज निर्माण झाले असून, ग्रामस्थांनी त्याबाबत संभ्रम बाळगू नये. जमिनीच्या वाटपाचा प्रश्न लवकरात लवकर मार्गी लावण्यासाठी शासनस्तरावर प्रयत्न सुरू आहेत, अशी माहिती आमदार दीपक केसरकर यांनी प्रसिद्धीपत्रकाद्वारे दिली.
चौकुळ ग्रामस्थांची बैठक १६ सप्टेंबर रोजी होणार आहे. मात्र, त्याच दिवशी कबुलायतदार गावकर सदरातील जमीन वर्ग १ मध्ये देण्यासंदर्भात महसूल मंत्र्यांसोबत मुंबई येथे बैठक आयोजित करण्यात आली असल्याने आपण चौकुळ येथे उपस्थित राहू शकणार नसल्याचे केसरकर यांनी स्पष्ट केले.
आंबोली व चौकुळ येथील कुळवहाटदार गावकर तसेच महाराष्ट्र शासनाच्या नावे असलेल्या जमिनीची मोजणी जिल्हा निबंधक कार्यालयामार्फत सर्व्हेअर एजन्सीकडे सोपविण्यात आली आहे. त्यापैकी चौकुळमधील सुमारे ९० टक्के मोजणी पूर्ण झाली असून उर्वरित मोजणी एका महिन्यात पूर्ण होईल. त्यानंतर आंबोली येथील मोजणीचे कामही पूर्ण करण्याचे नियोजन आहे. डोंगराळ व जंगलयुक्त भागामुळे मोजणीच्या कामास विलंब झाला असून, ते काम लवकर पूर्ण करण्यासाठी शासन प्रयत्नशील असल्याचे त्यांनी सांगितले.
कबुलायतदार गावकर जमिनीचे वाटप करताना वनक्षेत्रात येणारे क्षेत्र वगळून वाटप करावे, अशी आंबोली व चौकुळ ग्रामस्थांची मागणी शासनाने मान्य केली आहे. त्यानुसार वनक्षेत्र वगळण्याचा निर्णयही घेण्यात आला आहे. मात्र, वनखात्याने महाराष्ट्र महसूल न्यायाधिकरणाकडे अपील केल्याने हा विषय सध्या प्रलंबित आहे. हे प्रकरण लवकर निकाली काढण्यासाठी महसूल विभागाकडून प्रयत्न सुरू असल्याचे केसरकर यांनी स्पष्ट केले.
चौकुळ गावची कुटुंबसंख्या निश्चित करून, गावच्या मागणीनुसार जमिनीचे वाटप करण्याबाबतही शासनस्तरावर कार्यवाही सुरू आहे. २० सप्टेंबर २०२४ रोजीच्या पत्रानुसार चौकुळ गावातील जमिनीचे वाटप सर्वांना समान प्रमाणात करण्याबाबत निर्णय घेण्याची प्रक्रिया सुरू आहे. गावाला देण्यात आलेल्या अधिकारांचा योग्य वापर करून ग्रामस्थांनी कोणत्याही शंकेला बळी न पडता आवश्यक निर्णय घ्यावा, असे आवाहन केसरकर यांनी केले.
जमीन वर्ग १ ने वाटप करण्याची मागणी आपण शासनापर्यंत पोहोचविली असून, महसूल मंत्र्यांच्या बैठकीत याबाबत पाठपुरावा करणार असल्याचेही त्यांनी सांगितले. चौकुळ, आंबोली व गेळे गावांच्या जमिनीचे वाटप करताना शासनाने काही अटी शिथिल केल्यामुळे सर्व जमिनीचे वाटप ग्रामस्थांना समान प्रमाणात करणे शक्य झाले आहे. त्याचा लाभ ग्रामस्थांनी घ्यावा, असे आवाहन त्यांनी केले.
“चौकुळ गावाचा सर्वांगीण विकास व्हावा यासाठी मी नेहमीच प्रयत्नशील राहीन. ग्रामस्थांच्या निदर्शनास येणाऱ्या प्रत्येक प्रश्नाचा शासनाकडे पाठपुरावा केला जाईल,” अशी ग्वाही केसरकर यांनी दिली.
