कुडाळ : ‘स्वच्छ कुडाळ, सुंदर कुडाळ’ तसेच प्लास्टिकमुक्त कुडाळच्या संकल्पनेला बळ देण्यासाठी रोटरी क्लब ऑफ कुडाळच्या वतीने गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर कुडाळ बाजारपेठ आणि कुडाळ रेल्वे स्टेशन परिसरात तब्बल २ हजार कापडी पिशव्यांचे मोफत वितरण करण्यात आले. ‘प्लास्टिकची पिशवी नको, कापडी पिशवी हवी’ असा संदेश देत नागरिकांना प्लास्टिकचा वापर टाळण्याचे आवाहन करण्यात आले.
कुडाळ रेल्वे स्थानकावर चाकरमान्यांना कापडी पिशव्यांचे वाटप करण्यात आले. तसेच कुडाळ बाजारपेठेत नागरिकांना पिशव्या देऊन पर्यावरण संवर्धनाचा संदेश देण्यात आला. नागरिकांनीही या उपक्रमाला उत्स्फूर्त प्रतिसाद देत कापडी पिशव्यांचा वापर करण्याचा सकारात्मक प्रतिसाद दिला.
या उपक्रमावेळी रोटरी क्लब ऑफ कुडाळचे अध्यक्ष रो. मकरंद नाईक, कुडाळ पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक विकास बडवे, कुडाळ पंचायत समितीचे सभापती मिलिंद नाईक, रो. राकेश म्हाडदळकर, रो. डॉ. संजय केसरे, रो. गजानन कांदळगावकर, रो. राजन बोभाटे, रो. प्रमोद भोगटे, रो. राजीव पवार, रो. आनंद वेंगुर्लेकर, रो. प्रणय तेली, रो. सौ. नीता गोवेकर, रो. राजीव बिले, सौ. शिल्पा पवार यांच्यासह रोटरी क्लबचे सदस्य उपस्थित होते.
यावेळी नगरसेवक विलास कुडाळकर, कुडाळ नगरपंचायतीचे मुख्याधिकारी खंडू पावळ तसेच माजी गटविकास अधिकारी प्रफुल्ल वालावलकर यांचीही उपस्थिती होती.
रोटरी क्लब ऑफ कुडाळकडून सलग दोन वर्षे ‘स्वच्छ कुडाळ, सुंदर कुडाळ’ या संकल्पनेतून कापडी पिशव्यांचे वितरण केले जात आहे. यंदा २ हजार पिशव्या नागरिकांपर्यंत पोहोचविण्यात आल्या. या उपक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी रो. गजानन कांदळगावकर, माजी नगराध्यक्ष रो. ओंकार जी. तेली, रो. डॉ. जी. टी. राणे आणि रो. कौस्तुभ पाटणकर यांचे विशेष सहकार्य लाभले.
प्लास्टिकमुळे निर्माण होणारे पर्यावरणीय धोके लक्षात घेता दैनंदिन जीवनात कापडी पिशव्यांचा वापर वाढविणे आवश्यक आहे. रोटरी क्लबच्या या उपक्रमातून नागरिकांमध्ये पर्यावरणपूरक जीवनशैलीबाबत जनजागृती करण्याचा प्रयत्न करण्यात आला.
आज वाटलेली प्रत्येक कापडी पिशवी ही प्लास्टिकला पर्याय देणारी छोटी कृती असून, उद्याच्या स्वच्छ आणि हरित कुडाळसाठी मोठे पाऊल आहे, असा संदेश या उपक्रमातून देण्यात आला.
कुडाळ रोटरी क्लब कडून २ हजार कापडी पिशव्यांचे वाटप
