Headlines

सावंतवाडी नगरपरिषदेतील पाणीपुरवठा विभागाचे दोन रजिस्टर गायब…

कर निर्धारण अधिकारी रजेवर असताना रजिस्टर हाताळून विल्हेवाट लावल्याचा आरोप; कर्मचाऱ्याविरुद्ध गुन्हा दाखल..

⚡सावंतवाडी, ता. १३ -: सावंतवाडी नगरपरिषदेच्या पाणीपुरवठा विभागातील वस्तू नोंद व वापर रजिस्टरची विल्हेवाट लावल्याप्रकरणी नगरपरिषदेतील कर्मचारी भारत बाबू लाखे यांच्याविरुद्ध सावंतवाडी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणी महाराष्ट्र सार्वजनिक अभिलेख अधिनियमासह भारतीय न्याय संहितेतील संबंधित कलमांन्वये कारवाई करण्यात आली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, १९ ऑगस्ट रोजी सायंकाळी ५.१५ वाजेपासून २० ऑगस्ट रोजी दुपारी १२.४५ वाजेपर्यंतच्या कालावधीत सावंतवाडी नगरपरिषदेच्या पाणीपुरवठा विभागातील कार्यालयात ही घटना घडली. कर निर्धारण प्रशासकीय अधिकारी रजेवर असताना आरोपीने कार्यालयातील वस्तू नोंद व वापर रजिस्टर अशी दोन रजिस्टर हाताळली. त्यानंतर सदर रजिस्टर एका पिशवीत ठेवून त्यातील नोंदी दिसू नयेत या उद्देशाने त्यांची विल्हेवाट लावल्याचा आरोप आहे.
या प्रकरणी संजय गोविंद पोईपकर (वय ५१, रा. वझरवाडी, सावंतवाडी) यांनी फिर्याद दिली. त्यानुसार भारत बाबू लाखे (वय ५६, पद-जोडारी, सावंतवाडी नगरपरिषद, रा. लाखेवस्ती, सावंतवाडी) यांच्याविरुद्ध गुन्हा क्रमांक २४८/२०२६ नोंद करण्यात आला आहे.
भारतीय न्याय संहिता २०२३ मधील कलम २३८(ब), २४२ तसेच महाराष्ट्र सार्वजनिक अभिलेख अधिनियम २००५ मधील कलम ८ व ९ अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. शनिवारी रात्री ९.५३ वाजता गुन्ह्याची नोंद करण्यात आली. या प्रकरणात आरोपीच्या अटकेबाबत तजवीज सुरू असल्याचे पोलिसांनी सांगितले.
सपोनि हर्षद हिंगे तपास करीत असून पोलीस निरीक्षक राजेंद्र मगदूम यांच्या मार्गदर्शनाखाली तपास सुरू आहे.

You cannot copy content of this page