अतुल बंगे:हुमरमळा-वालावल ग्रा.प. मध्ये एसटी NCMC नोंदणी शिबिराचे आयोजन..
⚡कुडाळ ता.१२-: हुमरमळा (वालावल) गावातील ग्रामस्थ, महिला व युवकांना विविध शासकीय योजनांचा लाभ गावातच मिळावा, यासाठी आपण सातत्याने प्रयत्नशील असल्याचे प्रतिपादन माजी पंचायत समिती सदस्य अतुल बंगे यांनी केले.
हुमरमळा-वालावल ग्रामपंचायतीच्या वतीने आयोजित एसटी स्मार्ट कार्ड नोंदणी शिबिराचे उद्घाटन अतुल बंगे व सरपंच अमृत देसाई यांच्या हस्ते दीपप्रज्वलनाने करण्यात आले. यावेळी बंगे बोलत होते.
शासनाच्या विविध योजना घराघरात पोहोचविण्यासोबतच नव्याने सुरू होणाऱ्या योजनांचा लाभ गावातील नागरिकांना मिळावा, यासाठी आपण सातत्याने प्रयत्न करीत असल्याचे बंगे यांनी सांगितले. ग्रामपंचायत सरपंच अमृत देसाई, पंचायत समिती सदस्या अर्चना बंगे यांच्या मार्गदर्शनाखाली तसेच ग्रामसेविका अपर्णा पाटील यांच्या प्रशासकीय सहकार्याने गावातील विकासकामांसोबतच विविध शासकीय योजनांचा लाभ नागरिकांपर्यंत पोहोचविण्याचे काम सुरू असल्याचे त्यांनी नमूद केले.
“एसटी स्मार्ट कार्ड काढण्यासाठी गावातील नागरिकांना कुडाळ येथे वारंवार हेलपाटे मारावे लागू नयेत, यासाठी ग्रामपंचायतीतच नोंदणी शिबिर आयोजित करण्यात आले. शासकीय सुविधा नागरिकांच्या दारात पोहोचविणे, हाच या उपक्रमामागील उद्देश आहे,” असे अतुल बंगे यांनी स्पष्ट केले.
या शिबिराला वैभव जाधव, सरपंच अमृत देसाई, पोलीस पाटील सुबोध सावंत, दादा मयेकर, शैलेश मयेकर, अमित बंगे यांच्यासह ग्रामस्थ व शिबिरार्थी उपस्थित होते.
