Headlines

मोदी एक्सप्रेसने गणेशभक्तांचा कोकण प्रवास भक्तिमय…

कणकवली रेल्वे स्थानकात शुक्रवारी रात्री १०.३० वाजता आगमन:आरती, भजन आणि ‘गणपती बाप्पा मोरया’च्या जयघोषात हजारो चाकरमानी सिंधुदुर्गात दाखल..

⚡कणकवली ता.१२-: महाराष्ट्र राज्याचे मत्स्यव्यवसाय व बंदरे विकास मंत्री तथा सिंधुदुर्ग जिल्ह्याचे पालकमंत्री ना. नितेश राणे यांनी मुंबईहून सिंधुदुर्ग जिल्ह्यात जाणाऱ्या चाकरमानी गणेशभक्तांसाठी सोडलेली मोदी एक्सप्रेस शुक्रवारी रात्री १०.३० वाजता कणकवली रेल्वे स्थानकात दाखल झाली. गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर कोकणात येणाऱ्या हजारो गणेशभक्तांसाठी हा प्रवास भक्तिमय आणि आनंददायी ठरला.

मुंबईहून कोकणात गणेशोत्सवासाठी येणाऱ्या चाकरमान्यांचा प्रवास सुखकर व्हावा, यासाठी पालकमंत्री नितेश राणे यांच्या पुढाकारातून मोदी एक्सप्रेस सोडण्यात आली. या विशेष रेल्वेने प्रवास करताना गणेशभक्तांमध्ये उत्साहाचे वातावरण पाहायला मिळाले. नेहमीच्या रेल्वे प्रवासापेक्षा मोदी एक्सप्रेसमधील प्रवासाचा आनंद काही औरच असल्याची भावना कोकणवासीय गणेशभक्तांनी व्यक्त केली.

मोदी एक्सप्रेसच्या प्रवासादरम्यान आरती, भजन तसेच ‘गणपती बाप्पा मोरया’च्या जयघोषाने वातावरण भक्तिमय झाले. गणेशभक्तांनी एकत्रितपणे आरती व भजनात सहभाग घेतला. त्यामुळे मुंबईहून कोकणात येणारा हा प्रवास केवळ रेल्वे प्रवास न राहता गणेशोत्सवाच्या आनंदाची सुरुवात ठरला.

‘पालकमंत्री कसा असावा, याचा अनुभव आला’

मोदी एक्सप्रेसमधून प्रवास करणाऱ्या गणेशभक्तांनी पालकमंत्री नितेश राणे यांच्या उपक्रमाचे कौतुक केले. इतर वेळच्या प्रवासात जी मज्जा येत नाही, ती मोदी एक्सप्रेसमधून प्रवास करताना आली, अशी प्रतिक्रिया प्रवाशांनी व्यक्त केली.

‘आमची काळजी घेणारा पालकमंत्री म्हणजे काय आणि तो कसा असावा, याचा अनुभव ना. नितेश राणे यांच्या निमित्ताने घेता आला,’ अशी भावना कोकणवासीय गणेशभक्तांनी व्यक्त केली. केवळ मोदी एक्सप्रेसची घोषणा न करता, ती मार्गस्थ होत असताना पालकमंत्र्यांनी प्रवाशांची विचारपूस करून त्यांच्याशी संवाद साधला. आपल्या प्रवासाची आणि गणेशभक्तांची काळजी घेणारे पालकमंत्री जिल्ह्याला लाभले, ही भाग्याची गोष्ट असल्याचेही प्रवाशांनी सांगितले.

गणेशोत्सवासाठी आपल्या गावी येणाऱ्या चाकरमान्यांच्या चेहऱ्यावरचा आनंद आणि भक्तिभाव मोदी एक्सप्रेसच्या प्रवासात दिसून आला. आरती, भजन आणि बाप्पाच्या जयघोषात सुरू झालेला हा प्रवास कणकवली रेल्वे स्थानकात भक्तिमय वातावरणात पोहोचला. सिंधुदुर्ग जिल्ह्यात दाखल झालेल्या गणेशभक्तांनी आपल्या लाडक्या गणरायाच्या स्वागतासाठी कोकणभूमीत पाऊल ठेवले.

You cannot copy content of this page