आमदार निलेश राणे, जिल्हाप्रमुख दत्ता सामंत यांच्या उपस्थितीत नियुक्तीपत्र प्रदान
कुडाळ : शिवसेनेच्या अनुसूचित जाती संघटनेची कुडाळ-मालवण विधानसभा मतदारसंघातील संघटनात्मक बांधणी अधिक मजबूत करण्याच्या दृष्टीने श्रमिक कामगार संघटनेचे अध्यक्ष प्राजक्त चव्हाण यांची शिवसेना अनुसूचित जाती कुडाळ-मालवण प्रमुखपदी नियुक्ती करण्यात आली. आमदार निलेश राणे व जिल्हाप्रमुख दत्ता सामंत यांच्या उपस्थितीत चव्हाण यांना नियुक्तीपत्र देण्यात आले.
तळागाळातील कार्यकर्त्यांशी सातत्याने संपर्क, सामाजिक उपक्रम, जनतेचे प्रश्न तसेच बांधकाम कामगारांच्या विविध प्रश्नांसाठी केलेल्या कामाची दखल घेत चव्हाण यांच्यावर ही जबाबदारी सोपविण्यात आल्याचे सांगण्यात आले. कुडाळ-मालवण मतदारसंघातील अनुसूचित जाती समाजामध्ये संघटनात्मक बांधणी मजबूत करणे, कार्यकर्त्यांना एकत्रित करणे आणि पक्षाच्या विविध उपक्रमांना व्यापक स्वरूप देण्याचे आव्हान त्यांच्यासमोर असणार आहे.
आगामी काळात गाव, वाडी-वस्ती आणि बूथ पातळीपर्यंत संघटना मजबूत करण्यावर भर देणार असल्याचे चव्हाण यांनी सांगितले. युवा तसेच ज्येष्ठ कार्यकर्त्यांना सोबत घेऊन नव्या नेतृत्वाला संधी देण्याचा प्रयत्न राहणार असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले.
“आमदार निलेश राणे साहेब व जिल्हाप्रमुख दत्ता सामंत साहेब यांनी माझ्यावर दाखवलेला विश्वास ही माझ्यासाठी मोठी जबाबदारी आहे. पद मिळाले म्हणून थांबायचे नाही, तर या विश्वासाला कामातून उत्तर द्यायचे आहे. गावागावात संघटना मजबूत करून पक्षाला अधिक बळकटी देण्यासाठी पूर्ण ताकदीने काम करणार आहे,” असा निर्धार प्राजक्त चव्हाण यांनी व्यक्त केला.
चव्हाण यांच्या नियुक्तीमुळे शिवसेनेच्या पदाधिकारी व कार्यकर्त्यांमध्ये उत्साहाचे वातावरण असून, त्यांच्या माध्यमातून कुडाळ-मालवण मतदारसंघातील अनुसूचित जाती संघटनेला अधिक गतिमानता मिळण्याची अपेक्षा व्यक्त केली जात आहे.
