गुरुप्रसाद नाकील व सोहम पकाले यांचा वजनी गटात प्रथम क्रमांक: जिल्हास्तरीय स्पर्धेसाठी निवड..
⚡कणकवली ता.११-: क्रीडा व युवक सेवा संचालनालय, महाराष्ट्र राज्य, पुणे, जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय व जिल्हा क्रीडा परिषद, सिंधुदुर्ग यांच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या शासकीय कणकवली तालुकास्तरीय शालेय क्रीडा स्पर्धा २०२६-२७ मध्ये शंकर महादेव विद्यालय, कुंभवडेच्या कुस्तीपटूंनी उल्लेखनीय कामगिरी करत विद्यालयाच्या शिरपेचात मानाचा तुरा रोवला.
कासार्डे, कणकवली येथे पार पडलेल्या या तालुकास्तरीय शालेय क्रीडा स्पर्धेत शंकर महादेव विद्यालयातील दोन कुस्तीपटूंनी आपल्या दमदार कामगिरीने प्रतिस्पर्ध्यांवर मात करत प्रथम क्रमांक पटकावला.
इयत्ता दहावीतील गुरुप्रसाद नाकील याने ५१ किलो वजनी गटात उत्कृष्ट खेळाचे प्रदर्शन करत तालुक्यात प्रथम क्रमांक मिळविला. तसेच इयत्ता सातवीतील सोहम पकाले याने ३५ किलो वजनी गटात प्रथम क्रमांक पटकावत आपली गुणवत्ता सिद्ध केली. या कामगिरीमुळे दोन्ही खेळाडूंनी जिल्हास्तरीय कुस्ती स्पर्धेत प्रवेश निश्चित केला आहे.
दोन्ही खेळाडूंच्या यशामागे त्यांची सातत्यपूर्ण मेहनत, जिद्द, सराव आणि कुस्तीतील कौशल्य यांचा मोठा वाटा आहे. त्याचबरोबर विद्यालयाचे क्रीडा शिक्षक तुळशीदास पावसकर यांचे मोलाचे मार्गदर्शन या खेळाडूंना लाभले. त्यांच्या मार्गदर्शनाखाली विद्यार्थ्यांनी केलेल्या मेहनतीचे फलित या स्पर्धेतील यशातून दिसून आले.
या उल्लेखनीय यशाबद्दल संस्थाध्यक्ष खासदार अरविंदजी सावंत, सचिव शशिकांत सावंत, शाळा समिती कार्याध्यक्ष ॲड. राजेंद्र रावराणे, मुख्याध्यापिका, सर्व विश्वस्त, शाळा समिती सदस्य, गुरुकुल समिती सदस्य, सर्व शिक्षक-शिक्षकेतर कर्मचारी, विद्यार्थी व पालक यांच्या वतीने गुरुप्रसाद नाकील, सोहम पकाले तसेच क्रीडा शिक्षक तुळशीदास पावसकर यांचे अभिनंदन करण्यात आले.
तालुकास्तरीय स्पर्धेतील यशानंतर आता गुरुप्रसाद नाकील आणि सोहम पकाले हे जिल्हास्तरीय स्पर्धेत विद्यालयाचे प्रतिनिधित्व करणार असून, या स्पर्धेतही दोन्ही खेळाडूंकडून दमदार कामगिरीची अपेक्षा व्यक्त होत आहे.
