Headlines

सावंतवाडीच्या सुपुत्राची लेफ़्टनंटपदी झेप !

अनिकेत वाडकर यांची भारतीय सैन्यदलात लेफ्टनंटपदी निवड

कुडाळ : जबरदस्त इच्छाशक्ती, मनात असलेली देशभक्ती तसेच जिद्द, चिकाटी आणि परिश्रमाच्या जोरावर सावंतवाडीच्या सुपुत्राने भारतीय सैन्यदलात लेफ्टनंटपदी झेप घेतली आहे. मुलाचे सावंतवाडीचे आणि सध्या वडिलांच्या नोकरी निमित्त रत्नागिरीत वास्तव्यास असलेले अनिकेत निलेश वाडकर यांची नुकतीच भारतीय सैन्यदलात लेफ्टनंट पदी निवड झाली आहे. बिहार मधील गया येथे त्यांचे कमिशन होऊन राजस्थान येथे त्यांना पहिली पोस्टिंग मिळाली आहे.
मूळचे सावंतवाडी येथील रहिवासी असलेले निलेश वाडकर व स्नेहा वाडकर हे कोकण रेल्वेच्या सेवेत कार्यरत असल्याने त्यांचा परिवार सध्या रत्नागिरी येथे वास्तव्यास आहे. त्यांचे सुपुत्र अनिकेत निलेश वाडकर यांनी आपल्या बुद्धिमत्ता, जिद्द, चिकाटी आणि अथक परिश्रमाच्या जोरावर उल्लेखनीय यश संपादन करत भारतीय सैन्यदलात लेफ्टनंटपदी निवड मिळवली आहे.
अनिकेत याना लहानपणापासूनच सैन्यदलाबद्दल आकर्षण होते. देशसेवेचा हा चांगला मार्ग असल्याने सैन्यदलात करियर करायचे अशी त्यांची इच्छा होती. अनिकेत यांचे पूर्ण शिक्षण रत्नागिरी येथे झाले. तसेच सैन्य प्रशिक्षण ऑफिसर्स ट्रेनिंग अकॅडमी, गया-बिहार येथे पूर्ण झाले. प्रशिक्षणाचा कालावधी १ वर्षाचा होता. परीक्षा, मुलाखत आणि वैद्यकीय चाचणी या सर्व प्रक्रिया यशस्वीरित्या पूर्ण करण्यासाठी ५ वर्ष मेहनत घेतली. आता त्यांची सैन्यदलात अधिकारी म्हणून लेफ्टनंट या पदावर नियुक्ती झाली असून ते कोर ऑफ इंजिनियर्स मध्ये कमिशन झाले आहेत. सध्या त्यांचे पोस्टिंग राजस्थान येथे झाले आहे.
अलीकडेच ४ आणि ५ सप्टेंबर रोजी त्यांचा कमिशन सोहळा ऑफिसर्स ट्रेनिंग अकॅडमी गया (बिहार) येथे संपन्न झाला. अनिकेतचा हा कौतुक सोहळा पाहण्यासाठी त्याचे वडील निलेश, आई सौ. स्नेहा, तसेच छोटी बहीण, त्याची आत्या-काका डॉ रुपाली आणि डॉ संतोष शिंदे आवर्जून उपस्थित होते.
बालवयातच सैन्यात देशसेवेचे बीज मनात बाळगून तसे प्रयत्न करून भारतीय सैन्य दलात लेफ्टनंट पदावर निवड झालेल्या अनिकेत निलेश वाडकर या सिंधुपुत्राचे सर्वत्र कौतुक होत आहे.

You cannot copy content of this page