ना. नितेश राणे:चिपी विमानतळावर एमटीडीसीचे पर्यटन माहिती केंद्र सुरु..
⚡वेंगुर्ला ता.११-: सिंधुदुर्ग जिल्ह्याला जागतिक पर्यटनाच्या नकाशावर ठळकपणे अधोरेखित करण्याच्या दृष्टीने चिपी विमानतळावर महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळाच्या (एमटीडीसी) अधिकृत पर्यटक माहिती केंद्राचे उद्घाटन करण्यात आले. या विशेष उपक्रमामुळे सिंधुदुर्गात हवाई मार्गाने दाखल होणाऱ्या पर्यटकांचे स्वागत अधिक सुनियोजित पद्धतीने होणार असून, जिल्ह्याच्या सर्वांगीण पर्यटन विकासाला मोठी गती मिळण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. सिंधुदुर्गच्या पर्यटन विकासाला नवी दिशा देण्याचा संकल्प आहे, असे प्रतिपादन मंत्री तथा पालकमंत्री ना. नितेश राणे यांनी चिपी ( ता. वेंगुर्ला ) येथे बोलताना केले.
यावेळी सिंधुदुर्ग जिल्हा बँक अध्यक्ष मनीष दळवी,एमटीडीसीचे अधिकारी दिलीप माने,
अधिकारी, म्हापण जि. प. सदस्य यज्ञा साळगावकर, वेंगुर्ला उपसभापती सचिन देसाई, भाजपा वेंगुर्ला तालुकाध्यक्ष विष्णू उर्फ पप्पू परब, म्हापण पं. स. सदस्य विष्णू उर्फ आप्पी फणसेकर, कृषी उत्पन्न बाजार समिती उपसभापती प्रसाद पाटकर, कुशेवाडा सरपंच निलेश सामंत, भोगवेचे पर्यटन व्यावसायिक महेश सामंत, भोगवे उपसरपंच रुपेश मुंडये, साई माडये, आनंद गावडे, पालचे भाजपा पदाधिकारी कमलेश गावडे, भोगवे सोसायटी चेअरमन चेतन सामंत, दत्ता साळगावकर आदी, ग्रामस्थ उपस्थित होते.
पालकमंत्री ना. नितेश राणे म्हणाले, कोकणच्या समृद्ध निसर्गाची, ऐतिहासिक किल्ल्यांची आणि विस्तीर्ण समुद्रकिनाऱ्यांची ओळख पर्यटकांना थेट विमानतळावरच व्हावी यासाठी हे पाऊल उचलले आहे. पर्यटकांना कोणतीही दिशाभूल न होता जिल्ह्याच्या प्रत्येक पर्यटनस्थळाची
अचूक माहिती, आवश्यक पॅकेजेस आणि नियोजन एकाच छताखाली उपलब्ध करून देणे हा या केंद्राचा मुख्य उद्देश असून आगामी काळात एमटीडीसीच्या माध्यमातून सिंधुदुर्गात विविध पर्यटन महोत्सवांचे भव्य आयोजन करून स्थानिक रोजगार आणि अर्थव्यवस्थेला बळकटी दिली जाईल. एमटीडीसीचे अधिकारी दिलीप माने यांनी केंद्राच्या कार्यप्रणालीवर प्रकाश टाकत स्पष्ट केले की, चिपी विमानतळावर उतरणाऱ्या पर्यटकांना स्थानिक पर्यटन संपत्तीशी थेट जोडणारा हा एक विश्वासू दुवा ठरेल. पर्यटकांना
निवास व्यवस्थेची खात्रीशीर माहिती, सुरक्षित प्रवासाचे नियोजन आणि स्थानिक संस्कृतीची अचूक माहिती देऊन त्यांचा कोकण दौरा अधिक आनंददायी आणि अविस्मरणीय बनवण्यावर एमटीडीसीचा विशेष भर राहणार आहे.
या माहिती केंद्रामुळे केवळ पर्यटकांची गैरसोय दूर होणार नाही, तर स्थानिक गाईड्स, होमस्टे व्यावसायिक, हॉटेलियर्स आणि वाहनचालकांना मोठ्या प्रमाणावर थेट रोजगाराच्या संधी उपलब्ध होणार आहेत. विमानतळावरून मिळणाऱ्या या अधिकृत सेवेमुळे
सिंधुदुर्गच्या पर्यटनाला व्यावसायिक स्वरूप लाभेल आणि जिल्हा पर्यटनाच्या क्षेत्रात एक नवी झेप घेईल, असा ठाम विश्वास यावेळी मान्यवरांनी व्यक्त केला.
फोटो :
