पालकमंत्री नितेश राणे यांच्या सूचनेनुसार सांगुळवाडी, अरुळे, निमअरुळे, सडूरे-शिराळे मार्गाची तातडीने डागडुजी..
वैभववाडी प्रतिनिधी
सिंधुदुर्ग जिल्ह्याचे पालकमंत्री नामदार नितेश राणे यांच्या सूचनेनुसार वैभववाडी तालुक्यातील सांगुळवाडी, अरुळे, निमअरुळे तसेच सडूरे-शिराळे या गावांना जोडणाऱ्या इजिमा क्रमांक १० या प्रमुख मार्गावरील खड्डे बुजविण्याच्या कामास सुरुवात करण्यात आली आहे.
या मार्गावर मोठ्या प्रमाणात खड्डे पडल्याने वाहन चालकांना प्रवास करताना अडचणींचा सामना करावा लागत होता. याबाबत ग्रामस्थ, स्थानिक सरपंच-उपसरपंच तसेच नागरिकांकडून वेळोवेळी रस्त्याच्या दुरुस्तीची मागणी करण्यात आली होती. त्याची दखल घेत गणेश चतुर्थीच्या पूर्वसंध्येला खड्डे बुजविण्याचे काम सुरू करण्यात आले आहे.
मुंबई व इतर शहरांमधून गणेशोत्सवासाठी गावी येणाऱ्या चाकरमान्यांना प्रवासात गैरसोय होऊ नये, यासाठी हे काम तातडीने हाती घेण्यात आले आहे.
यावेळी वैभववाडी पंचायत समिती सभापती सिद्धेश रावराणे, लोरे जिल्हा परिषद सदस्या रिद्धी रितेश सुतार, खांबाळे पंचायत समिती सदस्य मंगेश लोके व खांबाळे पंचायत समिती शक्ती केंद्रप्रमुख प्रकाश पाटील यांच्या माध्यमातून या मार्गावरील खड्डे बुजविण्याचे काम सुरू करण्यात आले आहे.
पावसाळा संपल्यानंतर या रस्त्याच्या कायमस्वरूपी दुरुस्तीसाठी पालकमंत्री नितेश राणे यांच्या माध्यमातून विशेष निधीची तरतूद करण्यात येईल, अशी माहिती पंचायत समिती सभापती सिद्धेश रावराणे यांनी दिली.
