Headlines

ओसरगाव नालंग घर ते तोरसकर घर रस्त्यासाठी ग्रामस्थांचे आंदोलन

तात्पुरती डागडुजीसह खडीकरण-डांबरीकरणाचे लेखी आश्वासन मिळेपर्यंत आंदोलन सुरू ठेवण्याचा निर्धार

कणकवली : ओसरगाव येथील नालंग घर ते तोरसकर घरापर्यंत जाणाऱ्या रस्त्याच्या दुरवस्थेकडे प्रशासनाचे लक्ष वेधण्यासाठी ग्रामस्थांनी आंदोलन छेडले. गेल्या सुमारे ४० वर्षांपासून या रस्त्याचे खडीकरण व डांबरीकरण करण्याची मागणी होत असतानाही अद्याप ठोस कार्यवाही झालेली नसल्याने ग्रामस्थांनी तीव्र नाराजी व्यक्त केली.

गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर या रस्त्याची तातडीने तात्पुरती डागडुजी करण्यात यावी, तसेच पुढील काळात रस्त्याचे खडीकरण व डांबरीकरण करण्यात येईल, याबाबत लेखी निवेदन अथवा आश्वासन देण्यात यावे, अशी मागणी ग्रामस्थांनी केली.

जोपर्यंत गणेशोत्सवासाठी रस्त्याची तात्पुरती डागडुजी होत नाही आणि पुढील खडीकरण-डांबरीकरणाबाबत लेखी आश्वासन दिले जात नाही, तोपर्यंत आंदोलनातून उठणार नाही, अशी ठाम भूमिका आंदोलनकर्त्यांनी घेतली.

स्थानिक तसेच तालुका प्रशासनाने घटनास्थळी येऊन ग्रामस्थांच्या मागण्या ऐकून घ्याव्यात, अशी मागणी करण्यात आली. जोपर्यंत प्रशासन घटनास्थळी येत नाही, तोपर्यंत आंदोलन सुरूच ठेवू. वेळ पडल्यास गणपतीची पूजा याच ठिकाणी करू; मात्र मागण्या पूर्ण झाल्याशिवाय हटणार नाही, अशी भूमिका नागरिकांनी घेतली.

आंदोलनादरम्यान ग्रामस्थांनी जोरदार घोषणाबाजी केली. “कोण म्हणतंय देणार नाय, घेतल्याशिवाय राहणार नाय”, “आमच्या मागण्या पूर्ण करा, नाहीतर खुर्च्या खाली करा”, “सरपंचांनी दिलेली आश्वासने पूर्ण करा” अशा घोषणा देत प्रशासनाचे लक्ष वेधण्यात आले.

या आंदोलनात सखाराम परब, बबली राणे, गोपाळ तोरसकर, शांताराम तोरसकर, स्वप्नील तोरसकर, सुधाकर तोरसकर, सत्यवती परब, अनुसया परब, लता तोरसकर आणि अलका तोरसकर यांच्यासह ग्रामस्थ सहभागी झाले होते. गेल्या चार दशकांपासून प्रलंबित असलेल्या या रस्त्याच्या प्रश्नावर आता केवळ आश्वासने न देता प्रत्यक्ष कार्यवाही करण्यात यावी, अशी मागणी ग्रामस्थांनी केली आहे.

You cannot copy content of this page