Headlines

चेरापुंजीपेक्षाही अधिक पाऊस; तरी आंबोलीतील नुकसानग्रस्त भरपाईपासून वंचित…

महसूल विभागाच्या भोंगळ कारभारामुळे ग्रामस्थ अडचणीत; माजी सरपंच सावित्री पालेकर यांचा आरोप..

⚡आंबोली, ता. ११-: जुलै आणि ऑगस्ट महिन्यात आंबोली परिसरात मोठ्या प्रमाणात अतिवृष्टी होऊन अनेकदा पूरस्थिती निर्माण झाली. घाटातील रस्त्यांवर झाडे व दरडी कोसळल्या, अनेक ग्रामस्थांच्या घरांवर व मांगरांवर झाडे पडली. वादळी वाऱ्यामुळे घरांची व वाड्यांची छपरे उडाली, तसेच विद्युत वाहिन्यांचेही मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. काही भागात तब्बल १० ते १५ दिवस वीजपुरवठा खंडित होता. असे असतानाही आंबोलीतील एकाही नुकसानग्रस्ताला महसूल विभागाकडून नुकसानभरपाई मिळालेली नसल्याचा आरोप आंबोलीच्या माजी सरपंच सौ. सावित्री पालेकर यांनी केला आहे.

आंबोलीमध्ये भारतीय हवामान विभागाच्या (IMD) वतीने बसविण्यात आलेले पर्जन्यमापक यंत्र सौरऊर्जेवर कार्यरत आहे. मात्र, आंबोलीतील दाट धुके आणि अतिवृष्टीमुळे हे यंत्र योग्य प्रकारे कार्यरत राहत नसल्याचा दावा करण्यात आला आहे. त्याचवेळी आंबोलीतील भाऊ ओगले यांच्याकडे असलेल्या मॅन्युअल पर्जन्यमापकाच्या नोंदीमध्ये मोठ्या प्रमाणात पावसाची नोंद झाल्याचे पालेकर यांनी सांगितले.
अतिवृष्टी व वादळी वाऱ्यामुळे अनेक ग्रामस्थांच्या घरांचे, मांगरांचे तसेच इतर मालमत्तेचे नुकसान झाले. मात्र, महसूल विभागाने प्रत्यक्ष पाहणी न करता आंबोली परिसरात अपेक्षित पाऊस अथवा वादळी वारे झाले नसल्याचा अहवाल ग्राह्य धरल्यामुळे नुकसानभरपाईची प्रकरणे अपात्र ठरविण्यात आल्याचा आरोप पालेकर यांनी केला आहे. त्यामुळे नुकसानग्रस्त ग्रामस्थांमध्ये तीव्र नाराजी आहे.
दरम्यान, आंबोली परिसरातील कबुलायतदार जमीन प्रश्न वर्षानुवर्षे प्रलंबित असल्याने ग्रामस्थांना विविध शासकीय योजना, लाभ व अनुदानांपासून वंचित राहावे लागत असल्याचेही पालेकर यांनी नमूद केले. अतिवृष्टी, वन्यप्राण्यांमुळे होणारे शेतीचे नुकसान आणि प्रलंबित जमीन प्रश्नामुळे आंबोलीवासीय आधीच अडचणीत आहेत. त्यात आता अतिवृष्टी व वादळी वाऱ्यामुळे झालेल्या नुकसानीची भरपाईही नाकारली जात असल्याने ग्रामस्थांमध्ये संतापाचे वातावरण आहे.
महसूल विभागाने पर्जन्यमानाच्या नोंदींची फेरतपासणी करून प्रत्यक्ष नुकसानग्रस्त भागाची पाहणी करावी आणि पात्र नुकसानग्रस्तांना तातडीने शासनाच्या नियमानुसार नुकसानभरपाई द्यावी, अशी मागणी सौ. सावित्री पालेकर यांनी केली आहे.

You cannot copy content of this page