⚡बांदा ता.०६-: बांदा शहरात रविवारी गोव्यातून खरेदीसाठी आलेल्या ग्राहकांची मोठी गर्दी झाल्याने बांदेश्वर मंदिर मार्गावरील तिन्ही प्रमुख रस्त्यांवर प्रचंड वाहतूक कोंडी झाली. वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्याने वाहनचालकांसह नागरिकांना मोठ्या त्रासाला सामोरे जावे लागले. वाहतुकीचे योग्य नियोजन करण्यात पोलिस प्रशासन अपयशी ठरल्याचा आरोप महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे सावंतवाडी तालुकाप्रमुख मिलिंद सावंत यांनी केला.
गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर बांदा शहरात खरेदीसाठी मोठ्या प्रमाणात नागरिकांची गर्दी होणार आहे. त्यातच गोव्यातून येणाऱ्या ग्राहकांची संख्या वाढल्यास वाहतुकीवर मोठा ताण निर्माण होण्याची शक्यता आहे. मात्र, आजच शहरातील वाहतूक व्यवस्था कोलमडल्याने आगामी गणेश चतुर्थीत परिस्थिती आणखी गंभीर होण्याची भीती व्यक्त होत आहे.
वाहतुकीचे नियोजन करण्यासाठी बैठका घेतल्या जात असल्या तरी अशा बैठकांना स्थानिक नागरिक, व्यापारी व संबंधित घटकांना बोलावले जात नसल्याचा आरोपही मिलिंद सावंत यांनी केला. स्थानिक परिस्थितीची माहिती असलेल्या नागरिकांच्या सूचना विचारात घेऊन वाहतूक नियोजन करणे आवश्यक असल्याचे त्यांनी सांगितले.
आजची वाहतूक कोंडी ही आगामी गणेशोत्सवासाठी धोक्याची घंटा आहे. आजच अशी परिस्थिती निर्माण होत असेल तर गणेश चतुर्थीच्या काळात काय परिस्थिती होईल? असा सवाल सावंत यांनी उपस्थित केला. गणेशोत्सवापूर्वी वाहतूक व्यवस्थेचा आढावा घेऊन ठोस नियोजन करावे, अशी मागणी त्यांनी केली आहे.
फोटो:-
बांदा शहरातील बांदेश्वर मंदिर मार्गावर वाहतुकीची झालेली प्रचंड कोंडी.
बांदा शहराला वाहतूक कोंडीचा फटका; गणेशोत्सवातील नियोजनावर प्रश्नचिन्ह…
