सात थरांचा मानवी मनोरा रचत १ लाख १ हजार १११ रुपयांचे मानाचे बक्षीस पटकावले; संदीप गावडे यांच्या आयोजनाला नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद..
⚡सावंतवाडी ता.०६-: भाजपचे जिल्हा उपाध्यक्ष तथा जिल्हा परिषद सदस्य संदीप गावडे यांच्या संकल्पनेतून आणि आयोजनातून सावंतवाडीतील राणी पार्वतीदेवी हायस्कूलच्या पटांगणावर आयोजित करण्यात आलेल्या भव्य दहीहंडी उत्सवाला नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. राजापूर येथील गोविंदा पथकाने सात थरांची मानवी मनोरा रचत बाजी मारली आणि मानाच्या दहीहंडीचा मान पटकावला.
गेल्या काही वर्षांपासून संदीप गावडे यांच्या माध्यमातून सावंतवाडीत या भव्य दहीहंडी उत्सवाचे आयोजन करण्यात येत आहे. यंदाच्या उत्सवात राजापूर येथील गोकुळ गोविंदा पथकाने सात थरांचा मानवी मनोरा रचून १ लाख १ हजार १११ रुपयांच्या बक्षिसावर आपले नाव कोरले. गोविंदा पथकांच्या थरारक कामगिरीमुळे उपस्थित प्रेक्षकांमध्ये मोठा उत्साह निर्माण झाला.
दरम्यान, सावंतवाडीतील भटवाडी येथील महापुरुष मंडळाला यंदाच्या दहीहंडी सोहळ्यात पहिला मान देण्यात आला. त्यानंतर विविध गोविंदा पथकांनी आपल्या कौशल्याचे प्रदर्शन करत उपस्थितांची मने जिंकली.
या कार्यक्रमाला भाजप जिल्हाध्यक्ष प्रभाकर सावंत, जिल्हा उपाध्यक्ष तथा जिल्हा परिषद सदस्य संदीप गावडे, जिल्हा परिषद अध्यक्ष प्रमोद कामत, भाजप युवा नेते विनोद राऊळ, उपसभापती गौरव मुळीक, पंकज पेडणेकर, जितेंद्र गावकर, रवींद्र मडगावकर, मोहिनी मडगावकर, दिलीप भालेकर, सागर ढोकरे, पंकज तुळसूलकर, अभिजीत धुरी, अनिकेत आसोलकर, चैतन्य सावंत, साईनाथ हनपाडे, अभिषेक लाटे, किसान धोत्रे, अमित आसोलकर, विनेश तावडे, हितेन नाईक, लॉरेन्स डिसूझा, समीर नेमळेकर, आशीष यादव, साई संगम, रवी कलंगुटकर, हर्षल सावंत यांच्यासह भाजपचे पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.
गोविंदा पथकांच्या दमदार कामगिरीने आणि जल्लोषपूर्ण वातावरणाने संपूर्ण परिसर दुमदुमून गेला. नागरिकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहत दहीहंडी उत्सवाचा आनंद लुटला. गोविंदांच्या थरारक सलामीने सावंतवाडीतील दहीहंडी उत्सव उत्साहात आणि जल्लोषात पार पडला.
