सिंधुदुर्ग भाजपाचे आयोजन; ‘चला हवा येऊ द्या’ फेम कुशल बद्रिके यांची प्रमुख उपस्थिती: सर्वांनी उपस्थित राहण्याचे संदीप गावडे यांनी केले आवाहन..
⚡सावंतवाडी, ता. ५ -: सिंधुदुर्ग भाजपाच्या माध्यमातून आयोजित करण्यात आलेल्या ‘सुंदरवाडी दहीहंडी’ उत्सवाचा थरार आज, शनिवारी सावंतवाडीत रंगणार आहे. राणी पार्वती देवी महाविद्यालयाच्या पटांगणावर सायंकाळी ५ वाजता हा उत्सव होणार असून, ‘चला हवा येऊ द्या’ फेम अभिनेता कुशल बद्रिके यांची प्रमुख उपस्थिती राहणार आहे.
दहीहंडी उत्सवानिमित्त प्रेक्षकांसाठी विविध मनोरंजनात्मक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. यामध्ये कोल्हापूर येथील मर्दानी खेळ, ढोलपथक तसेच पारंपरिक नृत्यविष्कार सादर करण्यात येणार आहेत. त्यामुळे सावंतवाडीकरांना दहीहंडीच्या उत्साहासोबतच विविध सांस्कृतिक कार्यक्रमांची मेजवानी अनुभवता येणार आहे.
या दहीहंडी उत्सवात सर्वाधिक थर रचणाऱ्या गोविंदा पथकाला १ लाख ११ हजार १११ रुपयांचे रोख बक्षीस देण्यात येणार आहे. त्यामुळे विविध गोविंदा पथकांमध्ये चुरस निर्माण झाली असून, दहीहंडीचा थरार पाहण्यासाठी मोठी गर्दी होण्याची शक्यता आहे.
‘सुंदरवाडी दहीहंडी’ उत्सवात नागरिकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून उत्सवाचा आनंद घ्यावा, असे आवाहन सिंधुदुर्ग भाजपाच्या माध्यमातून करण्यात आले आहे. यावेळी भाजपा नेते संदीप गावडे यांनीही नागरिकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहण्याचे आवाहन केले आहे.
