अपघातग्रस्त गोविंदांवर तातडीने उपचारासाठी अतिरिक्त वैद्यकीय सुविधा उपलब्ध करण्याची राजू मसुरकर यांची मागणी..
⚡सावंतवाडी, ता.०५-: गोकुळाष्टमीनिमित्त शनिवारी जिल्ह्यात विविध ठिकाणी दहीहंडी उत्सव मोठ्या उत्साहात साजरा होणार आहे. दहीहंडी फोडताना गोविंदांना दुखापत होण्याची किंवा अपघात होण्याची शक्यता लक्षात घेता जिल्ह्यातील आरोग्य यंत्रणा सज्ज ठेवावी, अशी मागणी जीवन रक्षा वैद्यकीय प्रतिष्ठानचे अध्यक्ष तथा जिल्हा काँग्रेस सरचिटणीस राजू मसुरकर यांनी केली आहे.
दहीहंडी उत्सवादरम्यान दरवर्षी मोठ्या संख्येने गोविंदा सहभागी होतात. मानवी मनोरे रचताना तोल जाऊन पडणे, डोक्याला दुखापत होणे, हात-पायांना फ्रॅक्चर होणे तसेच इतर गंभीर दुखापती होण्याची शक्यता असते. अशा परिस्थितीत अपघातग्रस्त रुग्णांसोबत त्यांचे मित्र, नातेवाईक मोठ्या संख्येने रुग्णालयात दाखल होतात. त्यामुळे या कालावधीत रुग्णालयांवर अचानक अतिरिक्त ताण येण्याची शक्यता आहे.
या पार्श्वभूमीवर मसुरकर यांनी सिव्हिल सर्जन डॉ. श्रीपाद पाटील, डॉ. सुबोध इंगळे, जिल्हा निवासी वैद्यकीय अधिकारी डॉ. विशाल रेड्डी, सावंतवाडी उपजिल्हा रुग्णालयाचे अधीक्षक, हृदयरोगतज्ज्ञ तसेच १०८ रुग्णवाहिका सेवेचे जिल्हा प्रमुख विनायक पाटील यांच्याशी संवाद साधून आवश्यक आरोग्य सुविधा उपलब्ध ठेवण्याची विनंती केली.
दहीहंडी उत्सवाच्या कालावधीत सायंकाळी ७ ते रात्री १२ वाजेपर्यंत रुग्णालयांमध्ये जनरल सर्जन, हृदयरोगतज्ज्ञ, अस्थिरोगतज्ज्ञ, अतिरिक्त परिचारिका व आरोग्य कर्मचाऱ्यांचा स्टाफ उपलब्ध ठेवावा. तसेच १०८ व १०२ रुग्णवाहिका सज्ज ठेवाव्यात, अशी मागणी त्यांनी केली आहे.
विशेषतः डोक्याला गंभीर दुखापत, हृदयविकाराचा झटका, सर्पदंश यांसारख्या गंभीर रुग्णांसाठी १०८ व १०२ रुग्णवाहिका प्राधान्याने उपलब्ध करून देण्यात याव्यात. तसेच रुग्णालयांमध्ये एक्स-रे व सीटी स्कॅन यंत्रणेसाठी तंत्रज्ञही रात्री उशिरापर्यंत उपलब्ध असणे आवश्यक आहे.
दहीहंडी उत्सवादरम्यान एखादा अपघात घडल्यास जखमी व्यक्तीवर विलंब न करता तातडीने उपचार मिळावेत, यासाठी जिल्ह्यातील संपूर्ण आरोग्य यंत्रणा सज्ज ठेवावी, अशी विनंती राजू मसुरकर यांनी केली आहे.
