महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे व पालकमंत्री नितेश राणे यांच्याकडे केली होती मागणी:शासनाकडून जिल्हाधिकाऱ्यांना कार्यवाही करण्या बाबतचे पत्र,माजी नगराध्यक्ष समीर नलावडे यांची माहिती
⚡कणकवली ता.०४-: शहरातील पटवर्धन चौकातील जुन्या भाजी मार्केट लागत असलेली महसूल विभागाची जागा नगरपंचायत जवळ वर्ग करा अशी मागणी काही दिवसांपूर्वी महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे व सिंधुदुर्ग जिल्ह्याचे पालकमंत्री नितेश राणे यांच्याकडे केली होती. या मागणीला यश आले असून महसूल मंत्र्यांच्या व पालकमंत्री नितेश राणे यांच्या आदेशानुसार शासनाकडून महसूल व वन विभागाने जिल्हाधिकाऱ्यांना याबाबत आदेश दिले आहेत. त्यामुळे कणकवली नगरपंचायत च्या जुन्या भाजी मार्केट चा विकसित करण्याबाबतचा मार्ग आता मोकळा होणार आहे अशी माहिती कणकवलीचे माजी नगराध्यक्ष समीर नलावडे यांनी दिली. महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे हे कणकवलीत आले असताना त्यावेळी ही मागणी श्री नलावडे यांनी केली होती. या मागणी दरम्यान महसूल मंत्री श्री बावनकुळे यांनी समीर नलावडे यांनी दिलेल्या पत्रावर हिरव्या पेनाने पंधरा दिवसांमध्ये कार्यवाही करण्याबाबत शेरा मारला होता. व त्यानंतर याबाबत पालकमंत्र्यांच्या माध्यमातून सातत्याने श्री नलावडे यांनी पाठपुरावा केला होता. अखेर या पाठपुराव्याला यश आले असून जिल्हाधिकाऱ्यांना याबाबतचे पत्र प्राप्त झाले आहे. त्या पत्रानुसार 19 लाख 431 या जमिनीच्या बाजार मूल्य रक्कमे बाबत वित्तीय अधिकारी जिल्हाधिकाऱ्यांना असल्याने त्यांच्या स्तरावर याबाबतची पुढील कार्यवाही करण्याबाबत आदेश शासनाच्या महसूल व वन विभागाच्या कक्ष अधिकाऱ्यांनी दिले आहेत. तसेच याबाबतचे प्रस्ताव शासकीय पातळीवर पाठवला गेला आहे असेही पत्र प्राप्त झाले असल्याचे श्री. नलावडे यांनी सांगितले.
