पर्यटन संस्थेच्या अध्यक्ष सहदेव साळगावकर यांची भूमिका;
मालवण दि प्रतिनिधी
निवती लाईट हाऊस परिसरातील जलसफरीबाबत महाराष्ट्र सागरी मंडळाने जारी केलेल्या निर्देशांमुळे स्थानिक जलपर्यटन व्यावसायिकांमध्ये संभ्रम आणि भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. पर्यटकांची सुरक्षितता ही सर्वोच्च प्राथमिकता असल्याचे मान्य करतानाच, गेल्या अनेक वर्षांपासून स्थानिक पातळीवर सुरू असलेल्या जलपर्यटन व्यवसायाला अचानक नियमांच्या कक्षेबाहेर ठरविण्याऐवजी सुरक्षित आणि नियमानुकूल जलपर्यटनासाठी स्पष्ट व्यवस्था निर्माण करावी, अशी मागणी तारकर्ली पर्यटन विकास संस्थेचे अध्यक्ष सहदेव साळगावकर यांनी केली आहे.
निवती लाईट हाऊस हे सिंधुदुर्गच्या पर्यटन नकाशावरील महत्त्वाचे आकर्षण आहे. या परिसरात पर्यटकांना घेऊन जाणाऱ्या नौकांमुळे स्थानिक मच्छीमार, बोटचालक, जलपर्यटन व्यावसायिक, हॉटेल व्यावसायिक तसेच अन्य पर्यटनाशी संबंधित अनेक कुटुंबांना रोजगार मिळतो. त्यामुळे केवळ नियमांचा हवाला देऊन ही जलसफर बंद करण्याऐवजी नौकांची सुरक्षा तपासणी, आवश्यक परवाने, विमा, लाइफ जॅकेट, जीपीएस, संचार यंत्रणा, प्रशिक्षित चालक आणि प्रवासी क्षमतेचे काटेकोर पालन अशा उपाययोजनांद्वारे जलपर्यटन सुरू ठेवण्याचा मार्ग शोधणे आवश्यक आहे.
महाराष्ट्र सागरी मंडळाने आय.व्ही. अॅक्ट अंतर्गत नोंदणीकृत नौकांना त्यांच्या निर्धारित मर्यादेबाहेर खोल समुद्रात प्रवासी वाहतूक करण्यास मनाई असल्याचे स्पष्ट केले आहे. या नियमाचा व्यावसायिकांना विरोध नाही. मात्र, निवती लाईट हाऊससारख्या पर्यटनस्थळासाठी कोणत्या प्रकारची नौका, कोणत्या नोंदणीखाली, कोणत्या सुरक्षा निकषांसह आणि कोणत्या मार्गाने पर्यटकांना घेऊन जाऊ शकते, याबाबत शासनाने स्पष्ट आणि एकसंध मार्गदर्शक तत्त्वे जाहीर करणे गरजेचे असल्याचे साळगावकर यांनी म्हटले आहे.
पर्यटन व्यवसायिकांना ‘परवानगी नाही’ एवढे सांगून थांबविण्याऐवजी, संबंधित नौकांना आवश्यक तांत्रिक व सुरक्षा निकष पूर्ण करून घेण्याची संधी द्यावी. आवश्यक असल्यास नौकांची संयुक्त तपासणी करून पात्र नौकांना विशिष्ट मार्ग, क्षेत्र आणि प्रवासी क्षमतेनुसार परवानगी देण्याची व्यवस्था करता येऊ शकते.
पर्यटकांच्या सुरक्षिततेशी कोणतीही तडजोड केली जाणार नाही, अशी भूमिका पर्यटन संस्थेने स्पष्ट केली आहे. मात्र सुरक्षिततेच्या नावाखाली स्थानिक पर्यटन व्यवसाय ठप्प होईल, अशी परिस्थिती निर्माण होऊ नये. शासनाने व्यावसायिकांना विश्वासात घेऊन त्यांच्याशी संवाद साधत व्यवहार्य तोडगा काढणे आवश्यक आहे.
विशेष म्हणजे, जलपर्यटन व्यवसायिकांसाठी नुकतीच जिल्हाधिकारी यांच्या अध्यक्षतेखाली मार्गदर्शन कार्यशाळा आयोजित करण्यात आली होती. या कार्यशाळेत पोलीस, महाराष्ट्र सागरी मंडळ, वन विभाग आणि जलक्रीडा व्यावसायिक सहभागी झाले होते. त्यामुळे या चर्चेच्या पुढील टप्प्यात निवती जलसफरीसाठी स्वतंत्र सुरक्षा प्रोटोकॉल तयार करून त्यानुसार पर्यटन सुरू ठेवता येईल का, याचा शासनाने गांभीर्याने विचार करावा, अशी मागणी होत आहे.
निवती लाईट हाऊसपर्यंत पर्यटकांना घेऊन जाणाऱ्या नौकांना IRS नोंदणी आवश्यक असल्यास, त्यासाठी आवश्यक प्रक्रिया, तांत्रिक निकष, खर्च, कालावधी आणि संक्रमण कालावधी याबाबतही प्रशासनाने स्पष्ट माहिती द्यावी. अचानक व्यवसाय बंद पडल्यास स्थानिक व्यावसायिकांचे मोठे आर्थिक नुकसान होऊ शकते. त्यामुळे नियमांची अंमलबजावणी टप्प्याटप्प्याने आणि व्यावसायिकांना आवश्यक वेळ देऊन करावी, अशी मागणी तारकर्ली पर्यटन विकास संस्थेने केली आहे.
निवती जलसफरीचा प्रश्न हा केवळ काही बोट मालकांचा प्रश्न नसून सिंधुदुर्गच्या पर्यटन अर्थव्यवस्थेशी जोडलेला आहे. त्यामुळे शासनाने ‘जलसुरक्षा आणि पर्यटन विकास’ या दोन्हींचा समतोल साधणारा निर्णय घ्यावा, अशी पर्यटन संस्थेची भूमिका आहे.याबाबत बोलताना पर्यटन संस्थेचे अध्यक्ष सहदेव साळगावकर यांनी आमचा नियमांना विरोध नाही. पर्यटकांची सुरक्षितता आमच्यासाठीही सर्वोच्च आहे. मात्र सुरक्षिततेच्या सर्व अटी पूर्ण करून, आवश्यक परवाने घेऊन आणि प्रशासनाच्या मार्गदर्शनाखाली निवती जलसफर सुरू ठेवण्यासाठी शासनाने स्पष्ट मार्ग उपलब्ध करून द्यावा. स्थानिक पर्यटन व्यवसाय बंद करणे हा उपाय नसून सुरक्षित आणि नियमानुकूल पर्यटनाला प्रोत्साहन देणे हा मार्ग असल्याचे सांगितले
दरम्यान, निवती लाईट हाऊस जलसफरीबाबत निर्माण झालेला संभ्रम दूर करण्यासाठी महाराष्ट्र सागरी मंडळ, जिल्हा प्रशासन आणि पर्यटन व्यावसायिकांची संयुक्त बैठक घेऊन अधिकृत मार्गदर्शक सूचना व परवानगीची प्रक्रिया स्पष्ट करावी, अशी मागणी पर्यटन क्षेत्रातून होत आहे.
