Headlines

कुडाळ रेल्वे स्टेशनकडे जाणाऱ्या पुलावर बॅरिकेटिंगचा अभाव

मनसेचे आंदोलनाचे संकेत:मनसे उपजिल्हाध्यक्ष कुणाल किनळेकर यांचा इशारा..

⚡कुडाळ ता.०४-: कुडाळ रेल्वे स्टेशनकडे जाणाऱ्या मार्गावर दोन महिन्यांपूर्वी बांधण्यात आलेल्या पुलावर सुरक्षेच्या दृष्टीने आवश्यक बॅरिकेटिंग नसल्याने अपघाताचा धोका निर्माण झाला आहे. तसेच पुलाच्या परिसरातील रस्त्यावर मोठ्या प्रमाणात खड्डे पडल्याने वाहनचालक व नागरिकांना त्रास सहन करावा लागत आहे. या पार्श्वभूमीवर महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने सार्वजनिक बांधकाम विभागाकडे तातडीने उपाययोजना करण्याची मागणी केली आहे.
सार्वजनिक बांधकाम विभागामार्फत रस्ता किंवा पूल बांधताना संबंधित ठिकाणची भौगोलिक परिस्थिती, पावसाळ्यातील संभाव्य पूरस्थिती आणि सुरक्षेच्या बाबींचा विचार करून नियोजन केले जाते. मात्र, कुडाळ रेल्वे स्टेशन मार्गावरील नव्या पुलाच्या दुतर्फा अद्याप कोणत्याही प्रकारचे सुरक्षात्मक बॅरिकेटिंग करण्यात आलेले नाही, असा आरोप मनसेने केला आहे.
या भागात अतिवृष्टीच्या काळात मोठ्या प्रमाणात पाणी व पूरस्थिती निर्माण होते. त्यातच गणेश चतुर्थीच्या काळात रेल्वेने कुडाळमध्ये येणाऱ्या प्रवाशांची संख्या वाढणार असून, त्यांना घेण्यासाठी रिक्षा तसेच खासगी वाहनांची मोठी वर्दळ या मार्गावर होण्याची शक्यता आहे. त्यामुळे पुलावर सुरक्षात्मक उपाययोजना नसल्याने अपघाताचा धोका वाढू शकतो, अशी चिंता मनसेने व्यक्त केली आहे.
नुकतेच बांधकाम झालेल्या पुलावरील रस्त्याच्या भागातही मोठ्या प्रमाणात खड्डे पडले असून, रस्ता वाहतुकीसाठी सुस्थितीत करण्याची गरज आहे. गणेश चतुर्थीपूर्वी पुलाच्या दोन्ही बाजूंना कायमस्वरूपी बॅरिकेटिंग करून रस्ता सुस्थितीत न केल्यास मनसे स्टाईलने आंदोलन करण्यात येईल, असा इशारा मनसेचे उपजिल्हाध्यक्ष कुणाल किनळेकर यांनी दिला आहे.
तसेच, मागणीकडे दुर्लक्ष झाल्यास मनसेच्या वतीने ‘भीक मागो’ आंदोलन करण्यात येईल. या आंदोलनातून जमा होणारी रक्कम सार्वजनिक बांधकाम विभाग, कुडाळ यांच्याकडे सुपूर्द करून त्यातून पुलावर बॅरिकेटिंग उभारावे, अशी उपरोधिक भूमिका मनसेने घेतली आहे.

You cannot copy content of this page