जनतेला ‘अच्छे दिन’ऐवजी ‘बुरे दिन’: परशुराम उपरकर..
⚡सावंतवाडी ता.०४-: जिल्ह्यातील लोकप्रतिनिधी विकासकामांच्या मोठमोठ्या घोषणा करीत आहेत. मात्र प्रत्यक्षात विकासकामांसाठी निधी उपलब्ध नसल्याचे चित्र आहे. जिल्ह्यातील ठेकेदारांची सुमारे साडेचारशे कोटी रुपयांची देणी प्रलंबित असताना केवळ घोषणा करून विकास साधता येणार नाही, अशी टीका उबाठा शिवसेनेचे नेते तथा माजी आमदार परशुराम उपरकर यांनी केली.
जिल्ह्यातील विकासकामांसाठी नियोजन विभागाकडून केवळ दहा टक्के निधी उपलब्ध असल्याचे पत्र आले आहे. त्यामुळे नवीन कामे करू नयेत, अशी परिस्थिती निर्माण झाली आहे. एकीकडे पालकमंत्री, आमदार व खासदार मोठमोठ्या घोषणा करीत आहेत, तर दुसरीकडे प्रत्यक्षात विकासकामांना निधी मिळत नसल्याने कामे ठप्प आहेत, असा आरोप उपरकर यांनी केला.
महिलांसाठी विविध योजनांची घोषणा केली जाते; मात्र लाभ मिळविण्यासाठी मोठ्या प्रमाणात गर्दी होत असूनही अनेक महिलांना अपेक्षित सुविधा मिळत नाहीत. एसटी महामंडळाच्या बाबतीतही परिस्थिती गंभीर असून कणकवली व कुडाळ आगार बंद करण्याची वेळ येऊ नये, यासाठी शासनाने लक्ष देण्याची गरज आहे. महिला प्रवाशांना अर्ध्या तिकिटाची सवलत देतानाही अडचणी निर्माण होत आहेत. लाडक्या बहिणींच्या खात्यावरही वेळेवर पैसे जमा होत नसल्याचा दावा त्यांनी केला.
अनैतिक धंद्यांवर नियंत्रणाची मागणी
सिंधुदुर्ग जिल्ह्यात सुरू असलेले अवैद्य दारू, मटका, जुगार, ड्रग्ज व गांजासारखे अनैतिक धंदे बंद करण्याची जबाबदारी पोलिस प्रशासनाची आहे. केवळ मुलाखती देऊन किंवा घोषणा करून हे धंदे बंद होणार नाहीत. जिल्ह्यातील तरुणांमध्ये बेरोजगारी आणि व्यसनाधीनतेचे प्रश्न गंभीर होत असून तरुणांच्या आत्महत्यांसारख्या घटना चिंताजनक आहेत. जिल्हा पोलीस अधीक्षकांनी या सर्व प्रकारांवर प्रभावी नियंत्रण आणावे. कारवाई प्रभावीपणे झाल्यास शिवसेनेच्या वतीने पोलीस प्रशासनाचा जाहिर सत्कार करू, असेही उपरकर यांनी सांगितले.
नवीन पदाधिकाऱ्यांच्या नियुक्त्या प्रक्रियेचा भाग
शिवसेनेच्या जुन्या नावांवरून वाद निर्माण करण्याची गरज नाही. पक्षप्रमुख उद्धव ठाकरे हे सुरुवातीपासून संघटन मजबूत करण्यासाठी काम करीत आहेत. नवीन पदाधिकाऱ्यांच्या नियुक्त्या ही पक्षाच्या संघटनात्मक प्रक्रियेचा भाग आहे. गणपतीनंतर पक्षप्रमुख उद्धव ठाकरे तसेच अमित ठाकरे सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या दौऱ्यावर येणार असल्याचे उपरकर यांनी सांगितले.
मुंबई-गोवा महामार्गावरून राणे कुटुंबीयांवर निशाणा
राणे कुटुंबीय गेल्या २५ वर्षांपासून सत्तेत आहेत. तरीही मुंबई-गोवा महामार्गाचे काम अद्याप पूर्ण झालेले नाही. तळ कोकणावर केंद्र व राज्य सरकारकडून अन्याय होत असून महामार्गाच्या रखडलेल्या कामावरून सरकारचे अपयश स्पष्ट होते, अशी टीका उपरकर यांनी केली.
एकीकडे विकासाच्या घोषणा आणि दुसरीकडे प्रत्यक्षात निधीअभावी रखडलेली कामे, अपुऱ्या शासकीय सुविधा, बेरोजगारी आणि वाढते अनैतिक धंदे यामुळे जनतेसमोर गंभीर प्रश्न निर्माण झाले आहेत. त्यामुळे ‘अच्छे दिन’ येण्याऐवजी जनतेला ‘बुरे दिन’ अनुभवावे लागत आहेत, अशी घणाघाती टीका जी. जी. उपरकर यांनी केली.
यावेळी युवासेना तालुकाप्रमुख आशिष सुभेदार आबा चीपकर सुरेंद्र कोठावळे नाना सावंत आदेश सावंत रोहित मुळीक विनायक कवडेकर संजय सावंत आदी उपस्थित होते.
