Headlines

म्हापणमध्ये रंगली ‘नारळ लढवणे’ची जंगी स्पर्धा…

विशाल परब पुरस्कृत स्पर्धेला उत्स्फूर्त प्रतिसाद;१९२ स्पर्धकांचा सहभाग , विजेत्यांवर बक्षिसांची बरसात..

⚡वेंगुर्ले ता.०४-: कोकणच्या मातीत रुजलेल्या पारंपरिक खेळाला स्पर्धेचे स्वरूप देत युवा नेतृत्व निकित अशोक राऊळ, गुरुनाथ मडवळ व उत्साही मित्र मंडळाच्या वतीने आयोजित करण्यात आलेली ‘भव्य नारळ लढवणे स्पर्धेचे पर्व पहिले’ ही स्पर्धा गुरुवारी म्हापण बाजारपेठ येथे मोठ्या उत्साहात पार पडली. भाजप युवा नेते विशाल परब पुरस्कृत या स्पर्धेला परिसरातील नागरिक आणि स्पर्धकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला.
नारळ लढवण्याच्या पारंपरिक खेळातील थरार, चुरस आणि उत्साह अनुभवण्यासाठी म्हापण बाजारपेठेत नागरिकांनी मोठी गर्दी केली होती. प्रत्येक फेरीत स्पर्धकांमध्ये विजयासाठी रंगलेली चुरस पाहून उपस्थित प्रेक्षकांमध्येही उत्साह संचारला. स्पर्धकांचा जोश आणि प्रेक्षकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद यामुळे संपूर्ण बाजारपेठेत जल्लोषाचे वातावरण निर्माण झाले होते.

स्पर्धेचे प्रमुख अतिथी म्हणून भाजपा जिल्हा उपाध्यक्ष प्रसन्ना देसाई उपस्थित होते. यावेळी त्यांनी आयोजकांचे कौतुक करताना कोकणातील पारंपरिक खेळ आणि लोकपरंपरांचे जतन करण्याची गरज व्यक्त केली.
“नारळ लढवणे हा कोकणच्या संस्कृतीचा आणि ग्रामीण जीवनाचा अविभाज्य भाग आहे. आजच्या आधुनिक युगात अशा पारंपरिक खेळांना स्पर्धेच्या माध्यमातून व्यासपीठ मिळणे ही आनंदाची बाब आहे. युवकांनी पुढाकार घेऊन आपल्या मातीतल्या परंपरा जिवंत ठेवण्याचे काम करावे,” असे प्रतिपादन प्रसन्ना देसाई यांनी केले. यावेळी नगरसेवक सचिन शेट्ये उपस्थित होते.

स्पर्धेतील विजेत्यांसाठी आयोजकांकडून विशाल परब पुरस्कृत आकर्षक पारितोषिके ठेवण्यात आली होती. प्रथम क्रमांकाच्या विजेत्यास ११ हजार रुपये व आकर्षक चषक, द्वितीय क्रमांकाच्या विजेत्यास ७ हजार रुपये व आकर्षक चषक, तर तृतीय आणि चतुर्थ क्रमांकाच्या विजेत्यांना प्रत्येकी २ हजार ५०० रुपये व आकर्षक चषक देण्यात आले. सहभागी स्पर्धकांनाही भेटवस्तू देऊन त्यांचा उत्साह वाढविण्यात आला

या स्पर्धेचे यूट्यूबवर थेट प्रक्षेपण करण्यात आले. त्यामुळे म्हापण बाजारपेठेत प्रत्यक्ष उपस्थित असलेल्या नागरिकांसोबतच विविध ठिकाणच्या प्रेक्षकांनाही स्पर्धेचा थरार घरबसल्या अनुभवता आला. पारंपरिक खेळाला व्यापक व्यासपीठ मिळाल्याने या उपक्रमाचे विशेष कौतुक करण्यात आले.
युवकांच्या पुढाकाराचे नागरिकांकडून कौतुक
विशाल परब यांच्या पुरस्कृत सहकार्याने आणि युवकांच्या पुढाकाराने आयोजित करण्यात आलेल्या या स्पर्धेमुळे म्हापणच्या सांस्कृतिक आणि क्रीडा वातावरणात उत्साह निर्माण झाला. काळाच्या ओघात मागे पडत चाललेल्या पारंपरिक खेळांना नव्या पिढीपर्यंत पोहोचविण्याचा हा उपक्रम असल्याने उपस्थित नागरिकांनी आयोजकांचे अभिनंदन केले.
स्पर्धेच्या यशस्वी आयोजनासाठी निकित अशोक राऊळ, गुरुनाथ मडवळ व उत्साही मित्र मंडळाच्या सदस्यांनी विशेष परिश्रम घेतले. युवकांनी एकत्र येऊन पारंपरिक खेळाला दिलेले हे नवे रूप भविष्यात अशा अनेक उपक्रमांना प्रेरणा देणारे ठरणार असल्याचे मत उपस्थितांनी व्यक्त केले.

You cannot copy content of this page