नगरसेवक राकेश राणे यांचे राणे बांधवांसह ग्रामस्थांनी मानले आभार
कणकवली :
वीर शिरोमणी महाराणा प्रताप चौक’ या नामकरणासाठी नगरसेवक राकेश राणे यांनी केलेल्या प्रयत्नांबद्दल राणे बांधव, नातेवाईक, मित्रपरिवार आणि ग्रामस्थांनी त्यांचा शाल, श्रीफळ व पुष्पगुच्छ देऊन सत्कार केला. यावेळी उपस्थितांनी त्यांच्या प्रयत्नांबद्दल आभार व्यक्त करत या निर्णयाचे स्वागत केले.
महाराणा प्रताप यांच्या शौर्य, स्वाभिमान आणि पराक्रमाची प्रेरणा देणारे हे नामकरण कणकवली शहराच्या इतिहासात महत्त्वपूर्ण ठरणार असल्याची भावना यावेळी उपस्थितांनी व्यक्त केली.
कणकवली शहरातील रवळनाथ मंदिराजवळील महत्त्वाच्या चौकाला ‘वीर शिरोमणी महाराणा प्रताप चौक’ असे नाव देण्याच्या मागणीला अखेर मंजुरी मिळाली आहे. नगरसेवक राकेश राणे यांनी केलेल्या मागणीला यश आले असून, कणकवली नगरपंचायतीच्या सर्वसाधारण सभेत यासंदर्भातील ठराव मंजूर करण्यात आला आहे.
या निर्णयामुळे राणे बांधव, नातेवाईक, मित्रमंडळी तसेच ग्रामस्थांमध्ये आनंदाचे वातावरण निर्माण झाले. या पार्श्वभूमीवर आज महाराणा प्रताप चौक येथे वीर शिरोमणी महाराणा प्रताप यांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले. यावेळी उपस्थितांनी ‘महाराणा प्रताप यांचा विजय असो’, अशा घोषणा देत जयजयकार केला.
