⚡बांदा ता.३१-: येथील नट वाचनालयात आयोजित विष्णु नारायण गावकर पुरस्कृत, त्यांच्या पत्नी (कै.) सौ. विजया गावकर व मुलगा (कै.) बिपिन गावकर यांच्या स्मरणार्थ बालवाचक कथाकथन स्पर्धेत लहान गटात कनिका आनंद कोटणीस (जि. प. शाळा इन्सुली नं. १०) हिने प्रथम, तर मोठ्या गावात सार्थक राणे (नूतन माध्यमिक विद्यालय इन्सुली) याने प्रथम क्रमांक मिळविला.
लहान गटात माही तवटे (मदर क्वीन्स इंग्लिश स्कूल, सावंतवाडी) हिने द्वितीय क्रमांक मिळविला. आत्रेया आचार्य (कळसुलकर स्कूल, सावंतवाडी) हिने तृतीय क्रमांक मिळविला. रूही पालव (जि. प. शाळा इन्सुली नं. ६) व उत्तम कोंडूसकर यांना उत्तेजनार्थ क्रमांक मिळाले.
मोठ्या गटात तर ईश्वरी साटेलकर (मळगाव हायस्कूल) हिने द्वितीय क्रमांक पटकाविला. अस्मि आईर (दिव्यज्योती इंग्लिश स्कूल, डेगवे) हिने तृतीय क्रमांक मिळविला. अनिका राऊळ (मदर क्वीन्स इंग्लिश स्कूल, सावंतवाडी) व लीला बोर्डेकर (माध्यमिक विद्यालय, डेगवे) यांना उत्तेजनार्थ क्रमांक मिळाले.
नट वाचनालयाच्या वतीने आयोजित या स्पर्धेचा कार्यक्रम उत्साहात झाला. यावेळी वाचनालयाचे अध्यक्ष एस. आर. सावंत, उपाध्यक्ष निलेश मोरजकर, शंकर नार्वेकर, विशाखा गावकर, ज्येष्ठ नागरिक संघाचे अन्वर खान तसेच परीक्षक चंद्रकांत सावंत उपस्थित होते. मान्यवरांच्या हस्ते समई प्रज्वलित करून प्रतिमेस पुष्पहार अर्पण करण्यात आला. सहसचिव हेमंत मोर्य यांनी उपस्थित मान्यवरांचे स्वागत केले.
सचिव राकेश केसरकर यांनी स्पर्धेचे प्रास्ताविक केले. स्पर्धा दोन शालेय गटांत घेण्यात आली. इयत्ता तिसरी ते चौथी या लहान गटात १४ विद्यार्थ्यांनी, तर इयत्ता पाचवी ते सातवी या मोठ्या गटात १७ विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला.
विजेत्या स्पर्धकांना रोख पारितोषिक व प्रमाणपत्र देऊन गौरविण्यात आले. कार्यक्रमास प्रवीण परब, गुरुनाथ नार्वेकर, नेत्रा राणे, माधुरी गवस, ग्रंथपाल सुस्मिता नाईक, अमिता परब यांच्यासह शिक्षक, पालक व विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते. सूत्रसंचालन करून आभार राकेश केसरकर यांनी मानले.
फोटो:-
बांदा नट वाचनालयात आयोजित कथाकथन स्पर्धेतील विजेत्यांसोबत उपस्थित असलेले मान्यवर.
नट वाचनालयाच्या कथाकथन स्पर्धेत कनिका कोटणीस, सार्थक राणे प्रथम…
