Headlines

सावंतवाडी उपजिल्हा रुग्णालयातील आरोग्य व्यवस्थेवर अण्णा केसरकर आक्रमक…

⚡सावंतवाडी, ता.२९-: येथील उपजिल्हा रुग्णालयातील ट्रामा केअर युनिट आणि वीस डॉक्टर प्रत्यक्ष कुठे आहेत ते दाखवा, अशी मागणी स्वातंत्र्य सैनिक अण्णा केसरकर यांनी आज वैद्यकीय अधिक्षक डॉ।विशाल रेड्डी यांच्याकडे केली. आरोग्य प्रश्नी प्रसंगी आंदोलन करावे लागेल असा इशारा श्री.केसरकर यांनी दिला.
यावेळी वैद्यकीय अधिक्षक डॉ. विशाल रेड्डी निःशब्द झाले.

सावंतवाडी उप जिल्हा रुग्णालयात कित्येक वेळ पेशंट वैद्यकीय अधिकारी डॉक्टर यांची वाट पाहात बसले आहेत. पण आँथोपेडिक डॉ. निखिल अवधूत कुठे आहेत असा प्रश्न केसरकर आणि उपस्थित पेशंटच्या नातेवाईकांनी केला. त्यावर डॉक्टर परिक्षेच्या तयारीला गेल्याचे डॉ. रेड्डी यांनी सांगितले. इतका वेळ आम्ही डॉक्टरांची वाट पाहात आहोत पण कोणीही आम्हाला साधी माहिती सुध्दा देत नाही. आम्ही विनाकारण ताटकळत बसलो आहोत, याला जबाबदार कोण असा प्रश्न रुग्णांच्या नातेवाईकांनी केला. डॉक्टर अधिकृत रजेवर जात असतील तर त्याची माहिती का दिली जात नाही असा प्रश्न श्री.केसरकर यांनी केला.
श्री.केसरकर म्हणाले, आरोग्य प्रशासनाकडून उच्च न्यायालयात वीस डॉक्टर आहेत असा दावा केला जातो; ते वीस डॉक्टर कुठे आहेत. ट्रामा केअर युनिट असल्याचे सांगितले जाते; ते ट्रामा केअर युनिट कुठे आहे?.सक्षम ट्रामा केअर युनिट असेल तर पेशंट बांबुळी गोवा येथे का पाठवले जातात, याची उत्तरे द्यावीत. साध्या फँक्चरचा पेशंट सुध्दा बाहेर पाठवला जातो, असे श्री.केसरकर म्हणाले. त्यावर सी आर्म मशिन आल्यावर हाडांच्या शस्त्रक्रिया होतील, असे डॉ. रेड्डी म्हणाले.
श्री.केसरकर म्हणाले, स्ट्रक्चरल आँडिटचा रिपोर्ट आला आहे. त्यानुसार नवीन इमारतीच्या वरच्या मजल्यावर बांधकाम करता येणार नाही. या परिस्थितीत रुग्णालयाचे बांधकाम कुठे होणार? चार आठवडे आणि आठ आठवड्यात आवश्यक मशिनरी करतो असे आरोग्य संचालकांनी सांगितले आहे. पण ती मशिनरी ठेवणार कुठे आणि कशी? कारण आहे तीच जागा रुग्णालयाला पुरेशी होत नाही. त्यामुळे प्रत्यक्ष न्यायालयात दाखल केलेले आणि जमिनीवरची वस्तुस्थिती यात मोठी तफावत दिसते. यासंदर्भात पुन्हा दोन दिवसांनी उप जिल्हा रुग्णालयास भेट देणार आहे. तेव्हा पूर्ण माहिती द्यावी, काही अडचणी असतील तर त्याही सांगाव्यात. संबधीत अडचणी सोडविण्याचा जरुर प्रयत्न करु. मात्र आरोग्य प्रशासनाने वस्तुस्थिती मांडावी असे आवाहन श्री.केसरकर यांनी केले. यावेळी सामाजिक बांधिलकीचे रवी जाधव, संजय पालकर उपस्थित होते.

You cannot copy content of this page