अंगणवाडी केंद्रांची पाहणी; सुविधा, पोषण आहार व कामकाजाचा घेतला आढावा..
⚡सावंतवाडी, ता.२५-: जिल्हा परिषद सिंधुदुर्गच्या महिला व बालविकास समितीच्या सभापती अनुराधा महेशकुमार नारकर यांनी सावंतवाडी तालुक्याचा दौरा करून तालुका बाल विकास प्रकल्प कार्यालयासह विविध अंगणवाडी केंद्रांच्या कामकाजाचा आढावा घेतला. इन्सूली, वाफोली आणि बांदा येथील अंगणवाडी केंद्रांना भेट देत त्यांनी बालकांना उपलब्ध करून देण्यात येणाऱ्या सुविधा व योजनांची पाहणी केली.
यावेळी सभापती नारकर यांनी अंगणवाडी केंद्रांमधील पोषण आहार, शैक्षणिक साहित्य, स्वच्छता, परिसर तसेच बालकांसाठी उपलब्ध असलेल्या विविध सुविधांची माहिती घेतली. अंगणवाडी सेविका व मदतनीस यांच्याशी संवाद साधून बालकांच्या सर्वांगीण विकासासाठी आवश्यक असलेल्या बाबींची त्यांनी जाणून घेतली.
अंगणवाडी केंद्रांच्या कामकाजात येणाऱ्या अडचणी, आवश्यक सोयी-सुविधा व प्रलंबित बाबींबाबत संबंधित अधिकारी व कर्मचाऱ्यांकडून माहिती घेत नारकर यांनी आवश्यक त्या सूचना दिल्या. महिला व बालविकास विभागाच्या विविध योजना व उपक्रमांचा लाभ पात्र लाभार्थ्यांपर्यंत प्रभावीपणे पोहोचविण्यासाठी अधिक गतिमानतेने काम करण्याचे निर्देशही त्यांनी दिले.
या दौऱ्यावेळी पंचायत समिती सावंतवाडीच्या सभापती सुष्मिता जाधव, संबंधित लोकप्रतिनिधी, उपमुख्य कार्यकारी अधिकारी (बा.क.) प्रतीक उगारे, बाल विकास प्रकल्प अधिकारी शैलजा मातोंडकर, मुख्य सेविका, अंगणवाडी सेविका व मदतनीस तसेच संबंधित अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.
महिला व बालकांच्या कल्याणासाठी शासनाच्या विविध योजना प्रभावीपणे राबवून त्याचा लाभ तळागाळातील पात्र लाभार्थ्यांपर्यंत पोहोचविण्यासाठी जिल्हा परिषद महिला व बालविकास समितीच्या माध्यमातून सातत्याने प्रयत्न करण्यात येतील, असे सभापती अनुराधा नारकर यांनी यावेळी सांगितले.
