Headlines

सावंतवाडीत रंगणार ‘रानभाज्या व गावठी वस्तू महोत्सव’…

महिला व बालकल्याण समितीचा पुढाकार; २५ व २६ ऑगस्टला नगरपरिषद प्रांगणात आयोजन..

⚡सावंतवाडी, ता. २४ -: पावसाळ्यात निसर्गात नैसर्गिकरीत्या उगवणाऱ्या विविध रानभाज्यांची नागरिकांना ओळख व्हावी, तसेच त्यांच्या औषधी गुणधर्म व पौष्टिकतेबाबत जनजागृती व्हावी, या उद्देशाने सावंतवाडी नगरपरिषदेच्या महिला व बालकल्याण समितीच्या वतीने दोन दिवसीय ‘रानभाज्या व गावठी वस्तू महोत्सवा’चे आयोजन करण्यात आले आहे.

हा महोत्सव २५ व २६ ऑगस्ट २०२६ रोजी नगरपरिषद कार्यालयाच्या प्रांगणात सकाळी ८ ते सायंकाळी ६ वाजेपर्यंत सर्वांसाठी खुला राहणार आहे. महोत्सवाचे उद्घाटन २५ ऑगस्ट रोजी सकाळी १० वाजता नगराध्यक्षा श्रद्धा सावंतभोसले यांच्या हस्ते होणार आहे.
पावसाळ्याच्या दिवसांत जंगल व परिसरात विविध प्रकारच्या रानभाज्या नैसर्गिकरीत्या उपलब्ध होतात. या भाज्या चविष्ट असण्याबरोबरच अनेक औषधी गुणधर्म आणि पौष्टिक घटकांनी युक्त असतात. मात्र, बदलत्या जीवनशैलीमुळे नव्या पिढीतील अनेकांना या पारंपरिक रानभाज्यांची माहिती कमी होत चालली आहे. त्यामुळे रानभाज्यांचे महत्त्व नागरिकांपर्यंत पोहोचविण्यासाठी हा उपक्रम हाती घेण्यात आला आहे.
या महोत्सवात विविध प्रकारच्या रानभाज्यांची विक्री, तसेच गावठी वस्तूंचे प्रदर्शन व विक्री करण्यात येणार आहे. स्थानिक महिला, उत्पादक व नागरिकांना यामधून पारंपरिक खाद्यसंस्कृती आणि स्थानिक उत्पादनांना प्रोत्साहन मिळणार आहे.

नगरपरिषदेच्या महिला व बालकल्याण समितीच्या सभापती दिपाली दिलीप भालेकर यांनी नागरिकांनी या महोत्सवाला मोठ्या संख्येने भेट देऊन रानभाज्या व स्थानिक गावठी उत्पादनांची माहिती घ्यावी, असे आवाहन केले आहे.

You cannot copy content of this page