वेंगुर्ला
सावंतवाडी तालुक्यातील आजगाव शेटकरवाडी येथील रहिवासी मनीष गुंडू आजगावकर (वय 32) हा रविवारी सायंकाळी 4.35 वा. च्या सुमारास तुळस येथे
विहिरीच्या कठड्यावरून तोल जाऊन विहिरीत पडून मयत झाला आहे, अशी माहिती वेंगुर्ला पोलीस स्थानकातून देण्यात आली. यांप्रकरणी वेंगुर्ला पोलीस स्थानकात आकस्मिक मृत्यू नोंद करण्यात आली आहे.
आजगाव शेटकरवाडी येथील रहिवासी मनीष आजगावकर हा घरातून नापत्ता झाला होता. त्याचा नातेवाईकांमार्फत शोध सुरू होता. दरम्यान रविवारी तो सावंतवाडी येथे असल्याची माहिती मिळाल्यावर त्याच्या नातेवाईकांनी सावंतवाडी गाठले. दरम्यान मनीष हा आजगाव येथे जाण्यास तयार नसल्याने
त्याचे चुलत मामा मंदार मधुकर तुळसकर यांनी त्याला तुळस लिंगदाडवाडी येथे आणले. दरम्यान सायंकाळी तो घराच्या बाजूस असलेल्या विहिरीत तोल जाऊन विहिरीत पडून मयत झाल्याचे निदर्शनास आले. या घटनेची खबर मंदार मधुकर तुळसकर (रा.तुळस लिंगदाडावाडी) यांनी वेंगुर्ला पोलीस स्थानकात दिली. घटनेची माहिती मिळताच पीएसआय श्री.कांबळे, पोलीस हवालदार योगेश सराफदार, पोलीस कॉ. कलगोंडा यांनी घटनास्थळी दाखल होत पुढील प्रक्रिया केली. याबाबत वेंगुर्ला पोलीस निरीक्षक निसर्ग ओतारी यांच्या मार्गदर्शनाखाली योगेश सराफदार हे पुढील तपास करीत आहेत.याच्या पश्चात आई, वडील, मामा असा परिवार आहे.
आजगाव येथील युवकाचा तुळस येथे विहिरीत पडून मृत्यू
