मालवण संघ विजेता; जय मानसेश्वर संघ, वेंगुर्ला उपविजेता..
⚡सावंतवाडी ता.२४-: कारिवडे येथील हायस्कूलच्या मैदानावर सचिन सावंत मित्र मंडळाच्या वतीने आयोजित करण्यात आलेली भव्य व्हॉलीबॉल स्पर्धा मोठ्या उत्साहात आणि दिमाखात पार पडली. गोवा राज्य तसेच सिंधुदुर्ग जिल्ह्यातील तब्बल १६ मातब्बर संघांनी या स्पर्धेत सहभाग घेतला.
अंतिम सामन्यात मालवण संघाने प्रथम क्रमांक पटकावत विजेतेपदावर आपले नाव कोरले, तर जय मानसेश्वर संघ, वेंगुर्ला यांना द्वितीय क्रमांक मिळवत उपविजेतेपदावर समाधान मानावे लागले. स्पर्धेतील सामन्यांचे पंच म्हणून राधाकृष्ण पेडणेकर, सी. ए. नाईक सर आणि हेमंत गावडे यांनी काम पाहिले.
या स्पर्धेला भाजपा युवा नेते विशाल भाई परब यांचे विशेष सहकार्य लाभले. स्थानिक पातळीवर युवा उद्योजक महादेवजी नाईक व भव्यांश स्पोर्ट्स यांनी सहकार्य केले. तसेच कारिवडेचे उपसरपंच महेशजी गावकर, गंगाराम परब आणि विष्णु परब यांचे मार्गदर्शन व मदत लाभली.
स्पर्धेसाठी बाबल गोम्स, पीटर गोम्स, जॅक्सन गोम्स, कारू गोम्स आणि सतान गोम्स यांनी आर्थिक सहकार्य केले. स्पर्धेच्या यशस्वी आयोजनासाठी अमन गावकर, रोशन शेटकर, नानु परब, गणेश परब, ओम तागेश वास्कर, कृष्णा गावकर आणि कौस्तुभ गावकर यांनी विशेष परिश्रम घेतले.
सचिन सावंत मित्र मंडळाच्या नियोजनबद्ध आयोजनामुळे ही स्पर्धा स्थानिक क्रीडाप्रेमींच्या पसंतीस उतरली. स्पर्धेदरम्यान खेळाडूंच्या उत्कृष्ट खेळाला प्रेक्षकांनी उत्स्फूर्त दाद दिली.
