वेंगुर्ला
वेंगुर्ला तालुक्यातील वजराट ग्रामपंचायतच्या स्ट्रीटलाईटच्या माहितीसंदर्भात महावितरणकडून अद्याप माहिती न मिळाल्यामुळे सोमवारी (24 ऑगस्ट ) ग्रामपंचायत व ग्रामस्थ यांच्या वतीने जिल्हाधिकारी कार्यालय सिंधुदुर्ग येथे उपोषण छेडण्यात आले.
यावेळी वजराट ग्रा.पं. सरपंच अनन्या पुराणिक, आनंद पुराणिक, माजी ग्रा.पं. सदस्य प्रेमानंद सावंत -भोसले, संदिप पेडणेकर, ग्रा.पं. सदस्य रसिका मेस्री, प्रियांका केरकर, शामसुंदर पेडणेकर, चेतन नाईक, श्री गिरेश्वर सोसायटी चेअरमन मनोहर परब, साईप्रसाद केरकर आदीसह पदाधिकारी ग्रामस्थ सहभागी झाले होते.
दि.२२ जुलै रोजी ग्रामपंचायत कार्यालय वजराट यांनी स्ट्रीट लाईटच्या देखभाल-दुरुस्ती संदर्भातील वायरमन/लाईनमन यांच्या कामाची व जबाबदारीची लेखी माहिती ८ दिवसांत देण्याची मागणी केली होती. निर्धारित मुदतीत माहिती न मिळाल्याने दि. ४ ऑगस्ट २०२६ रोजी स्मरणपत्र देण्यात आले होते. तरीही माहिती उपलब्ध न झाल्याने वेंगुर्ला येथे दि.१५ ऑगस्ट रोजी लाक्षणिक उपोषण छेडण्यात आले होते. त्यावेळी महावितरणच्या संबंधित अधिकाऱ्यांनी लेखी पत्र देऊन मागितलेली माहिती 7 दिवसांत उपलब्ध करून देण्याचे आश्वासन दिल्यामुळे उपोषण स्थगित करण्यात आले होते. परंतु, अद्यापही माहिती न मिळाल्याने ग्रामपंचायत व ग्रामस्थांनी शासनाचे लक्ष वेधण्यासाठी सोमवारी लाक्षणिक उपोषण छेडले. स्ट्रीटलाईटची देखभाल व दुरुस्ती करण्याबाबतचा लागू असलेला शासन निर्णय (GR) त्वरित उपलब्ध करून द्यावा, या कामाची नेमकी जबाबदारी व कार्यपद्धती लेखी स्वरूपात स्पष्ट करण्यात यावी, गावातील बंद व नादुरुस्त स्ट्रीटलाईटची तात्काळ दुरुस्ती करण्यात यावी, आदी मागण्या यावेळी करण्यात आल्या आहेत. दरम्यान प्रशासनाने या मागण्यांची तातडीने दखल घेऊन दखलपात्र कार्यवाही न केल्यास भविष्यात आंदोलन अधिक तीव्र करण्याचा इशारा उपोषणकर्त्यांनी दिला आहे.
वजराट ग्रा.पं. व ग्रामस्थांचे स्ट्रीटलाईटच्या माहितीसाठी लाक्षणिक उपोषण
