Headlines

कुडाळमध्ये मुंबई विद्यापीठाच्या सिनेट सदस्यांचा ७ सप्टेंबरला विशेष दौरा…

विद्यार्थी, प्राध्यापक व संस्थांच्या समस्या जाणून घेणार:नगरसेवक मंदार शिरसाट यांचा पुढाकार..

⚡कुडाळ ता.२४-: मुंबई विद्यापीठाच्या अधिसभेचे (सिनेट) सदस्य सोमवार, ७ सप्टेंबर रोजी कुडाळच्या विशेष दौऱ्यावर येणार आहेत. ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक समस्या, महाविद्यालयांमधील अडचणी तसेच पायाभूत सुविधांचा आढावा घेण्यासाठी विद्यार्थी, प्राध्यापक आणि महाविद्यालयीन व्यवस्थापनाशी सिनेट सदस्य थेट संवाद साधणार आहेत. नगरसेवक मंदार शिरसाट यांच्या पुढाकारातून या दौऱ्याचे आयोजन करण्यात आले आहे.
या दौऱ्यात विद्यार्थ्यांना भेडसावणाऱ्या विविध समस्यांवर चर्चा होणार आहे. परीक्षा निकालास होणारा विलंब, पुनर्मूल्यांकनाचे प्रश्न, हॉल तिकीट व गुणपत्रिकांमधील चुका तसेच अन्य शैक्षणिक अडचणींबाबत विद्यार्थी व युवा संघटनांच्या प्रतिनिधींची मते जाणून घेतली जाणार आहेत.
मुंबई विद्यापीठाच्या सिंधुदुर्ग उपकेंद्राचा प्रश्नही यावेळी चर्चेच्या केंद्रस्थानी राहणार आहे. उपकेंद्राची रखडलेली कामे, उपलब्ध सुविधांमधील त्रुटी आणि स्थानिक विद्यार्थ्यांना विद्यापीठाच्या सेवा अधिक प्रभावीपणे मिळण्यासाठी आवश्यक उपाययोजनांबाबत महाविद्यालयातील शैक्षणिक घटकांशी चर्चा करण्यात येणार आहे.
नवीन शैक्षणिक धोरणाच्या (NEP) अंमलबजावणी दरम्यान महाविद्यालयांना येणाऱ्या अडचणी, क्रेडिट सिस्टीम तसेच त्यासंदर्भातील शैक्षणिक बाबींचाही आढावा घेतला जाणार आहे. यावेळी विविध महाविद्यालयांतील विद्यार्थी व संघटनांना आपल्या प्रलंबित मागण्यांची निवेदने सिनेट सदस्यांकडे सादर करता येणार आहेत.
कुडाळ व परिसरातील ज्या विद्यार्थ्यांना विद्यापीठाशी संबंधित काही समस्या किंवा प्रलंबित प्रश्न असतील, त्यांनी आपल्याशी संपर्क साधावा, असे आवाहन नगरसेवक मंदार शिरसाट यांनी केले आहे.

You cannot copy content of this page