Headlines

गाबीत समाज सिंधुदुर्ग जिल्हाध्यक्षपदी चंद्रशेखर उपरकर यांची फेरनिवड…

हरिश्चंद्र खोबरेकर कार्याध्यक्ष, महेंद्र पराडकर सरचिटणीस

⚡मालवण,ता.२३-:
गाबीत समाज सिंधुदुर्ग जिल्हा संघटनेच्या नुकत्याच झालेल्या जिल्हा सर्वसाधारण सभेत जिल्हाध्यक्षपदी श्री. चंद्रशेखर उपरकर यांची एकमताने फेरनिवड करण्यात आली. कार्याध्यक्षपदी श्री. हरिश्चंद्र खोबरेकर, तर सरचिटणीसपदी श्री. महेंद्र पराडकर यांची निवड करण्यात आली.

मालवण येथील गाबीत समाज नागरी सहकारी पतसंस्था सभागृहात ही बैठक झाली. यावेळी नूतन विश्वस्त मंडळ, पदाधिकारी व कार्यकारी मंडळाची निवड जाहीर करण्यात आली. १७ सदस्यीय पदाधिकारी मंडळात सहचिटणीसपदी श्री. मेघनाद धुरी व सौ. पूजा सरकारे, खजिनदारपदी श्री. पांडुरंग कोचरेकर, हिशोब तपासनीसपदी श्री. दीपक तारी यांची निवड करण्यात आली. तसेच डॉ. प्रमोद कोळंबकर, श्री. शंकर ऊर्फ दादा वाघ, श्री. संजय बांदेकर, सौ. स्नेहा केरकर, सौ. सेजल परब, श्री. पृथ्वीराज ऊर्फ बाबी जोगी, श्री. संजय केळुस्कर, श्री. मिथुन मालंडकर व श्री. नरेश हुले यांची कार्यकारी मंडळाचे विश्वस्त सदस्य म्हणून निवड करण्यात आली.

निवडीनंतर मालवण नगरपालिकेचे बांधकाम सभापती तथा नगरसेवक श्री. सहदेव बापर्डेकर व उपाध्यक्ष श्री. संजय पराडकर यांच्या हस्ते जिल्हाध्यक्ष श्री. चंद्रशेखर उपरकर यांचा पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला. यावेळी देवगड तालुका सरचिटणीस श्री. लक्ष्मण तारी, श्री. बाळा मुणगेकर, श्री. रमेश तारी यांच्यासह अन्य पदाधिकारी उपस्थित होते.

यावेळी बोलताना देवगड तालुका गाबीत संघटनेचे अध्यक्ष श्री. संजय पराडकर यांनी चंद्रशेखर उपरकर यांच्या कार्याचे कौतुक केले. जिल्हाध्यक्ष म्हणून गेल्या तीन वर्षांत त्यांनी गाबीत समाजासाठी सातत्याने केलेल्या सर्वांगीण कार्याची प्रशंसा केली. यापूर्वीही त्यांनी सुमारे २५ वर्षे गाबीत समाजाचे जिल्हा संघटक म्हणून काम करत समाजासाठी भरीव योगदान दिल्याचे त्यांनी सांगितले.

गाबीत समाजाचा प्रमुख व्यवसाय मच्छिमारी व पर्यटनाशी संबंधित असून, पर्यटन संस्था, रापण मच्छिमार संघटना, महिला मच्छिमार संघटना, सांस्कृतिक कार्यक्रम, शिबिरे, मेळावे, विविध आंदोलने, मोर्चे तसेच गाबीत महोत्सवाच्या माध्यमातून समाजाच्या विविध प्रश्नांवर सातत्याने आवाज उठविण्याचे काम उपरकर यांनी केले आहे. त्यामुळे त्यांचे मार्गदर्शन व सहकार्य समाजासाठी मोलाचे ठरत असल्याचे पराडकर यांनी नमूद केले.

निवडीनंतर बोलताना जिल्हाध्यक्ष श्री. चंद्रशेखर उपरकर यांनी आगामी गणेश चतुर्थीनंतर जिल्हा कार्यकारी मंडळासह गाबीत समाजाची वस्ती असलेल्या किनारपट्टी भागातील तसेच अन्य गावांमध्ये संपर्क दौरा आयोजित करण्यात येणार असल्याचे सांगितले. या दौऱ्याच्या माध्यमातून समाजातील विविध घटकांशी संवाद साधून संघटना अधिक मजबूत करण्यासाठी प्रयत्न केले जातील, असे त्यांनी स्पष्ट केले.

शेवटी सरचिटणीस श्री. महेंद्र पराडकर यांनी आभार मानले.

You cannot copy content of this page