⚡सावंतवाडी ता.२३-: एक्स्ट्रा स्कूल, बंगळुरू यांच्या वतीने इंटरनॅशनल ह्युमन राइट्स असोसिएशन, गोवा स्टेट चॅप्टर यांच्या सहकार्याने शैक्षणिक वर्ष २०२५-२६ मधील आंतरराष्ट्रीय शब्दलेखन स्पर्धा, लेखन कौशल्य स्पर्धा, चित्रकला स्पर्धा, लहान मुलांसाठी ऑलिम्पियाड स्पर्धा या राष्ट्रीय स्तरावरील स्पर्धांतील राष्ट्रीय गुणवंत विद्यार्थ्यांचा पारितोषिक वितरण समारंभ शनिवार दिनांक 22 ऑगस्ट रोजी मडगांव, रवींद्र भवन, गोवा येथे उत्साहात पार पडला.
या विशेष समारंभासाठी प्रमुख सन्माननीय अतिथी,
गोवा सरकारचे NRI व्यवहार आयुक्त व ज्येष्ठ विधिज्ञ श्री.नरेंद्र के. सावईकर तसेच
प्रमुख पाहुणे,भारत सरकारचे ऊर्जा तसेच नवीन व नवीकरणीय ऊर्जा राज्यमंत्री मा.श्री. श्रीपाद य. नाईक उपस्थित होते.
या समारंभात राष्ट्रीय स्तरावरील टॉप १० क्रमांक मिळविणाऱ्या विद्यार्थ्यांचा विशेष सन्मान करण्यात आला. या मानाच्या यादीत दिव्य ज्योती स्कूल, डेगवेच्या दोन विद्यार्थिनींनी स्थान मिळवून शाळेच्या शैक्षणिक व कलात्मक गुणवत्तेची राष्ट्रीय पातळीवर दखल मिळवून दिली.
शैक्षणिक वर्ष २०२५-२६ मध्ये इयत्ता ८वीत असलेल्या व सध्या इयत्ता ९वीत शिक्षण घेत असलेल्या कु. स्वीडल एडवर्ड रॉड्रिग्ज हिने ‘रायटिंग विझार्ड ‘ स्पर्धेत राष्ट्रीय स्तरावर तृतीय क्रमांक पटकावला.
तसेच, शैक्षणिक वर्ष २०२५-२६ मध्ये इयत्ता ९वीत असलेल्या व सध्या इयत्ता १०वीत शिक्षण घेत असलेल्या कु. मृदुला नाना सावंत हिने ‘ डूडल डर्बी ड्रॉइंग ओलिंपियाड’ मध्ये राष्ट्रीय स्तरावर दहावा क्रमांक मिळवून उल्लेखनीय यश संपादन केले.
दोन्ही विद्यार्थिनींच्या या नेत्रदीपक यशाबद्दल त्यांचे दिव्य ज्योती स्कूलचे मुख्याध्यापक, शिक्षकवृंद व पालकांनी अभिनंदन करून पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या. त्यांच्या या यशामुळे शाळेच्या शिरपेचात आणखी एक मानाचा तुरा रोवला गेला असून, विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी शाळेत राबविण्यात येणाऱ्या विविध उपक्रमांना मिळालेल्या यशाची ही राष्ट्रीय पातळीवरील गौरवशाली पावती ठरली आहे.
