Headlines

वळणावर एसटीची कारला जोरदार धडक..

तिघे जखमी:जामदा पुलाजवळ अपघात; एसटी व कारचे मोठे नुकसान, चालकाविरोधात गुन्हा..

⚡वैभववाडी ता.२२-: सिंधुदुर्ग व रत्नागिरी हद्दीवरील जामदापुलाजवळ एसटी बस आणि स्विफ्ट डिझायर कार यांच्यात झालेल्या अपघातात कारमधील तिन जण जखमी झाले आहेत. एसटी चालकाने कारला धकड देत अक्षरशा फरफटत नेले. मात्र कार चालकाने दाखविलेल्या प्रसंगावधनामुळे कोणालाही गंभीर दुखापत झाली नाही. यामध्ये एसटी व कार या दोन्ही वाहनांचे मोठया प्रमाणावर नुकसान झाले आहे. शनिवारी सकाळी सुमारे ७ वाजण्याच्या सुमारास हा अपघात झाला.
या प्रकरणी कारचालक अमित रमेश साटम रा. शिरगाव देवगड यांनी दिलेल्या तक्रारीवरून एस. टी. चालकाविरोधात राजापूर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
या अपघातात कारमधील युधीराज भिकाजी राणे (वय ३२), विघ्नेश रामदास म्हाळवदे (वय २५) आणि राज रामदास म्हाळवदे (वय २२) हे तिघे जखमी झाले आहेत. हे तिघेही शिरगाव, ता. देवगड, जि. सिंधुदुर्ग येथील रहिवासी आहेत.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार अमित रमेश साटम शिरगाव देवगड हे आपली कार क्रमांक MH 07 BG 9097 घेऊन सिंधुदुर्ग शिरगाव येथून आपल्या मित्रांसह प्रवास करत होते. ते कारने केळवली-पाचल मार्गे अणुस्कुरा दिशेने पुणेकडे जात असताना वैभववाडीच्या दिशेने येणारी कणकवली आगाराची भुईबावडा रिंगेवाडी खारेपाटण एमएच 20 BL 3079 क्रमांकाची एसटी बस चालक गणपती भाऊसाहेब जाधव (वय ४७) यांच्या ताब्यात होती. तर या बसवर वाहक म्हणून श्री दशरथ गोविंद जाधव हे काम पहात होते. सदरची एसटी बस ही केळवली फाटयावरील जामददा पुलाच्या जवळ आली असताना वळणाच्या रस्त्याच्या परिस्थितीकडे योग्य लक्ष न देता एस. टी. चालकाने बस भरधाव वेगात चालविल्याने या बसने समोरून येणाऱ्या या कारला जोरदार धडक दिली. यामुळे कार रस्त्यावर एसटी बस बरोबर फरफटत गेली. या अपघातात कार मधील तीन जण जखमी झाले आहेत.
या अपघाताची माहिती मिळताच राजापूर पोलीस निरीक्षक अमित यादव, पोलीस हेडकाँस्टेबल रहिम मुजावर यांनी घटनास्थळी धाव घेतली. जखमींना तेथील प्राथमिक आरोग्य केंद्रात उपचार करण्यात आले. राजापूर एसटी प्रशासनाला याबाबत माहिती मिळताच राजापूर अगार प्रमुख काव्या पेडणेकर, वाहतुक नियंत्रक अजय सिडाम यांनी अपघातस्थळी धाव घेतली. तर विभागीय वाहतूक अधीक्षक सिंधुदुर्गचे निलेश लाड यांनी देखील तात्काळ अपघातस्थळी भेट दिली. या अपघातत एसटी बसचे सुमारे चाळीस हजार तर कारचे सुमारे साठ हजाराचे नुकसान झाल्याची प्राथमिक नोंद करण्यात आली आहे.
या प्रकरणी राजापूर पोलीसांनी एस. टी. चालक गणपती जाधव यांच्या विरोधात भारतीय न्या संहिता कलम २८१, १२५ (अ) व मोटार वाहन कायदा कलम १८४ प्रमाणे गुन्हा दाखल केला आहे. या प्रकरणी अधिक तपास राजापूर पोलीस करत आहेत.

You cannot copy content of this page