Headlines

सिंधुदुर्ग-रत्नागिरीत ८० टक्के भरती स्थानिक युवकांचीच करा…

आमदार प्रमोद जठार यांच्या भूमिकेला माजी नगराध्यक्ष बबन साळगावकर यांचा जोरदार पाठिंबा..

⚡सावंतवाडी ता.२२-: सिंधुदुर्ग व रत्नागिरी जिल्ह्यातील बेरोजगार युवकांना स्थानिक पातळीवर रोजगाराच्या संधी उपलब्ध करून देण्यासाठी जिल्ह्यातील नोकरभरतीमध्ये ८० टक्के जागा स्थानिक युवक-युवतींसाठी राखीव ठेवाव्यात, अशी मागणी विधान परिषद आमदार प्रमोद जठार यांनी केली आहे. त्यांच्या या भूमिकेला माजी नगराध्यक्ष बबन साळगावकर यांनी जोरदार पाठिंबा दर्शविला आहे.
दहा हजार शिक्षकांची भरती तसेच जिल्हा संवर्गातील भरती पूर्ववत करण्यासाठी आमदार प्रमोद जठार आगामी हिवाळी अधिवेशनात विधेयक आणणार आहेत. त्यामुळे सिंधुदुर्ग व रत्नागिरी जिल्ह्यातील बेरोजगार युवकांना स्थानिक पातळीवर नोकरीच्या संधी उपलब्ध होण्याची आशा निर्माण झाली आहे. ही मागणी यापूर्वीच पूर्ण होणे आवश्यक होते; मात्र आता जठार यांनी यासाठी पुढाकार घेतल्याने त्यांचे स्वागत करणे आवश्यक असल्याचे साळगावकर यांनी सांगितले.
सिंधुदुर्ग जिल्ह्यात रोजगाराच्या मर्यादित संधी उपलब्ध असल्याने येथील अनेक युवक नोकरीच्या शोधात पुणे, मुंबई, बंगळुरू, हैदराबाद आणि गोवा आदी ठिकाणी स्थलांतरित होत आहेत. परिणामी जिल्ह्याच्या लोकसंख्येवरही त्याचा परिणाम होत असून अनेक दुर्गम गावांमध्ये तरुणांची संख्या दिवसेंदिवस कमी होत आहे.

सह्याद्रीच्या कड्याकपारीतील अनेक गावांमध्ये तरुणवर्ग रोजगारासाठी बाहेर गेल्याचे चित्र आहे. त्यामुळे काही गावे आता वृद्धांची गावे म्हणून ओळखली जाऊ लागली आहेत. जिल्ह्याची लोकसंख्या स्थिर राहण्यासाठी तसेच स्थानिक युवकांना रोजगार उपलब्ध करून देण्यासाठी जिल्ह्यातील नोकरभरतीमध्ये स्थानिकांना प्राधान्य मिळणे गरजेचे आहे.

सिंधुदुर्ग व रत्नागिरी जिल्ह्यातील ८० टक्के नोकरभरती स्थानिक युवक-युवतींचीच व्हावी, ही आमची ठाम भूमिका असून आमदार प्रमोद जठार यांच्या या प्रयत्नांना आमचा पूर्ण पाठिंबा आहे, असे बबन साळगावकर यांनी स्पष्ट केले.

You cannot copy content of this page